उत्तम पाचरणे : ललित कलेची समृद्ध ओळख

    दिनांक  31-Jul-2020 23:45:16
|


Uttam Pacharne_1 &nb
या महाराष्ट्राचा कलासूत डॉ. उत्तम पाचरणे नावाचा शिल्पकार, एका वेगळ्या अर्थाने ललित कला अकादमीचा अध्यक्ष नव्हे, तर ‘शिल्पकार’ बनला! भारत सरकारला या शिल्पकाराच्या छन्नी-हातोड्याची पकड ललित कलेच्या खडकाला नव्याने आकार देण्यासाठी गरजेची वाटली! कुठल्याही राजकारणाला, कलाकारणाला बळी न पडता, डॉ. उत्तम पाचरणे ललित कलेचे ‘शिल्पकार’ ठरले.सारं-सारं एखाद्या चाकरमान्याप्रमाणे सुरु असतं. मुंबईतील लोकलमधल्या चाकरमान्यांमध्ये आणि कलेच्या क्षेत्रातील बर्‍याचशा भागांमध्ये फारशी तफावत नसते, असं साधारण वर्णन करावं, इतकी खंतावणारी अवस्था. ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचे राजकारण हा आबालवृद्धांचा तसा आवडता विषय. मला तर वाटतं वृत्तपत्रातील भविष्य सांगणारा ‘आजचा दिवस’ हा कॉलम अज्ञानींपासून ज्ञानाच्या भंडारी व्यक्तीपर्यंत जसे सारेजण आवडीने वाचतात. मग कुणी उघडउघड वाचतात तर कुणी चोरून, लपून वाचतात. पण, १२ राशींचे भविष्य जसे सर्वच जणं वाचतात, तद्वतच त्यानंतर ‘राजकारण’ नामक विषयाचादेखील चॉकलेट वा लॉलिपॉपप्रमाणे चघळत चघळत चर्चेने का होईना, परंतु चवीने स्वीकारलेला आवडीचा विषय असतो. प्रत्येकजणांना नशीब ‘आजमायला’ अन् नशीब ‘आजमावायला’ भाग पाडायला लावणारा विषय. मग ते राजकारण घरातून म्हणजे अगदी आपल्या कुटुंबापासून सुरु होतं, तर ते थेट अगदी आताच्या कोरोना संदर्भाचा आधार घेत थेट जागतिकस्तरापर्यंतच्या राजकारणापर्यंत येऊन ही गाडी थांबते.


आमच्या कलाक्षेत्राचंही एक फार भन्नाट ‘राजकारण’ म्हणण्यापेक्षा ‘कलाकारण’ आहे. छान चालत असतं. छोटे छोटे गट, मग गटबाज्या, मग गट-तट अगदी गट-बुरुजांपर्यंत...! दोन वर्षांपूर्वी आमच्या कलाक्षेत्रात एक घटना घडली. ही घटना चक्क कलाक्षेत्रात घडली हाच मोठा चमत्कार आहे. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या भू-क्षेत्र असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या, कर्जत तालुक्यातील एक अत्यंत लहान खेडेगावातील ‘उत्तम’ माणसाने थेट भारताच्या प्रथम नागरिकास नोंद घेण्यास भाग पाडलं. भारताच्या राष्ट्रपतींनी ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार डॉ. उत्तम पाचरणे यांना ललित कला अकादमी, नवी दिल्लीचं राष्ट्रीय स्तरावरील एकमेव सरकारी कला संस्थेचं अध्यक्ष केलं. इथे ‘केलं’ हा शब्द फार विचार करुन उपयोगात आणलाय. ‘बनवलं’, ‘नियुक्ती दिली’ असे शब्द वापरले असते, तर पडद्यामागे काहीतरी राजकारण घडलं, असं म्हणायला एखादी तरी फट सापडतेच. ‘केलं’ असं म्हटल्यामुळे असल्या राजकारणाचीदेखील फट सापडत नाही.

वास्तविक, महाराष्ट्रातच काय, अख्ख्या हिंदुस्तानात कलाकार, कलासम्राट कलातपस्वी, कलामहर्षी, कलाज्ञानी, कलायोगी वगैरे कितीतरी कलागुरुंची नावे घेता येतील. राजकारण असतंच तर यांच्यापैकी बर्‍याच जणांनी ललित कला अकादमीशी आपलं नाव जोडलं जावं, यासाठी प्रयत्न केले नसतील, तरच नवल आणि दोन वर्षांपूर्वी एक घटना घडली. या सार्‍या प्रचलित, ओंगळवाण्या ‘कलाकारणा’ला मूठमाती देत, या महाराष्ट्राचा कलासूत डॉ. उत्तम पाचरणे नावाचा शिल्पकार, एका वेगळ्या अर्थाने ललित कला अकादमीचा अध्यक्ष नव्हे, तर ‘शिल्पकार’ बनला! भारत सरकारला या शिल्पकाराच्या छन्नी-हातोड्याची पकड ललित कलेच्या खडकाला नव्याने आकार देण्यासाठी गरजेची वाटली! कुठल्याही राजकारणाला, कलाकारणाला बळी न पडता, डॉ. उत्तम पाचरणे ललित कलेचे ‘शिल्पकार’ ठरले. त्यांच्या त्रिमित संकल्पनांवर सार्‍या भारतात, किंबहुना जगभरात लिहून आलेलं आहे. त्यांच्या चित्र व शिल्पशैलीवर अनेकांनी अनेक चक्षूंनी अंत:चक्षूंनी लिहिलेलं आहे, लिहीत आहेत. मात्र, त्यांच्या कला-संघटनांवर म्हणजे त्यांच्या ‘संघटन-कौशल्या’वर फारसं कुणी लिहिलेलं मला तरी वाचायला मिळालेलं नाही. त्यांची जशी ललित कला अकादमीवर ‘अध्यक्ष’ म्हणून नियुक्ती झाली, त्या दिवसापासून ललित कलेनेच कात टाकली.


सर्व कला सहोदर आहेत. ‘कले’च्या उदरातूनच सर्व कलांचा जन्म झालेला आहे. सहोदर शिल्पकला, चित्रकला, उपयोजित कला, वस्त्रकला, अशा सर्वच दृश्य कलांचा जन्म ललित कलेच्या उदरातून झालेला आहे, असे ठामपणे सांगत डॉ. उत्तम पाचरणे यांनी आल्या आल्या मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टला सहयोगी बनवून दोन वर्षांपूर्वीच्या मार्च-एप्रिल महिन्यात भारतातील पूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात न झालेला असा ‘आर्ट उत्सव’ साजरा केला. सार्‍या भारतातून उत्तम प्रतिभाशक्तीच्या कला-प्रज्ञावंतांना, डॉ. उत्तम पाचरणे यांनी एकाच कलामंचावर आणले. जे. जे.च्या थंड पडलेल्या हिरवळीवर (?) कलाकारांची मांदियाळी सुरु होती. नॅशनल गॅलरी, फोर्ट, जहांगिर कलादालन या नेहमी वैविध्यपूर्णतेने चर्चेत असलेल्या कलास्थानांपेक्षाही जे. जे. आणि ललितकलेत आकस्मिक एक कलाहुंकार चेतला. कलाचैतन्याने सारा महिना-दीड महिना भारावलेला होता. स्वत:ला कलाकार समजणारे, स्वत: कलाकार असणारे आणि स्वत:ला ‘कलोपासक’ म्हणवणारे अशा तीन कलाप्रवृत्तींना डॉक्टरांनी सुंदर कलोपचार केले आणि उत्तम प्रकृतीने ‘कलासृजन’ उत्सव साजरा केला.


माझा आणि शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांचा याच काळात समक्ष परिचय झाला. गेली २०-२५ वर्षे मी त्यांना त्यांच्या नावाने आणि त्यांच्या कलासृजनाने ओळखायचो आणि त्यांनीही कदाचित माझेही नावं ऐकले असेल. मी एक जे. जे.तील कलाध्यापक म्हणून! एवढीच आमची २५ वर्षांची नावाची ओळख. जे. जे.तील महिन्याभराच्या कलाउपक्रमांच्या माध्यमातून मला शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांच्याशी एकादा-दोनदा भेटण्याचा योग आला. मी त्यांना पहिल्या भेटीत विचारलं की, “या कलोत्सवात जे जे कलाकार पाहायला मिळत आहेत, हे सारे ‘६३’ या अंकाप्रमाणे एकत्रित आलेले दिसतात. एरवी ‘३६’ प्रमाणे असणारे (काही अपवाद वगळता) म्हणजे खूपदा कोणीही कुणाबद्दल कुणाच्या पाठीमागे अथवा कुणाच्या गैरहजेरीत चांगल्या अर्थाने बोलतच नाहीत आणि बोललेच तर टीका-टिपण्या करतच (टीका नव्हे बरं का!) बोलणार. अशा सार्‍या चेहर्‍यांना आपण एकाच कलोत्सवात कसं काय एकत्रित आणू शकलात?” यावर ज्यांनी दिलेलं उत्तर हे इतकं उत्तम आहे की, हे ललित कला अकादमीच्याच नव्हे, तर जे. जे.सह सार्‍या कलाजगताच्या कला इतिहासाच्या पानांवरील सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावं असं आहे. ते म्हणाले, “मी या कलोत्सवात ‘राजकारण’ वा ‘कलाकारण’ याला प्रवेशच करु दिला नाही.” म्हणजे ‘राजकारण’ वा ‘कलाकारणा’ने कलेची अधोगतीच झालेली आहे, हे शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणूनच त्यांच्या सुमारे दोन वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या कलाकार्य-काळात ललित कला अकादमीनेदेखील कात टाकली. वादग्रस्त किंवा अभद्र हेतूंनी प्रेरित असलेल्यांना त्यांनी दूर ठेवत सुमारे शंभरावर कलाउपक्रम आसेतुहिमाचल त्यांनी यशस्वीपणे राबविले, नव्हे तर साजरे केले आहेत. जगभरातील कलागॅलरीत, कलास्थळे, कलावास्तू अशा अनेक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व ज्ञातीतील कलाकारांना वयोमान न पाहता आणि केवळ कला सृजनक्षमतांच्या निकषावरच मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. यापुढेही त्यांचे अनेक स्तुत्य उपक्रमांची नियोजने ठरलेली आहे. भारत सरकारला तर त्यांच्या रुपाने एक नि:पक्षपातीपणे, पारदर्शीपणे कलागुणांना वाव देणारा, पारखं करणारा कला-प्रशासक मिळाल्यामुळे पुढील काही वर्षे तरी डॉ. पाचरणेंनाच ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदासाठी दुसरा चेहरा शोधण्याची गरज पडणार नाही, असे वाटते.

डॉ. पाचरणे यांनी सुमारे चार तपं ही महाराष्ट्रातील कलाजगतात, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या जडणघडणीत आणि महाराष्ट्राच्या कलेला राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. ते बराच काळ ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्ष म्हणून स्मरणात राहतील, अशी त्यांची कारकिर्द. त्यांनी ‘बॉम्बे आटर् सोसायटी’मध्ये आज जी नावे चर्चिली जातात, कलाजगतात अशा अनेकांना व्यासपीठ मिळवून दिले. कलासृजनाबरोबरच कलाक्षेत्र सृजनाचा वसा त्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांच्या कलाशैलीबरोबरच त्यांच्या कलाप्रशासनाकडे अनेकजण आकर्षिले गेले. मला त्यांच्यातील माणूस आणि त्यांच्यातील विनम्र कलाकार फारच तीव्रपणे जाणवला. त्यांच्याशी कधी फोनवरुन संपर्क झाला, तर ते पाऊस-पाण्याच्या विषयावर कधीच बोलताना जाणवले नाहीत. त्यांच्या प्रत्येक वेळच्या संवादात कला-कॅम्प, कलामेळा, कलाशाळा अगदी आताही ‘लॉकडाऊन’च्या काळातही ते कलाजगाताच्या संपर्कात आहोत. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्यातील कलाप्रशासकाने काही ऑनलाईन बैठका, वेबिनार्स, गुगल क्लासरुम संवाद अशा अत्याधुनिक प्रकारे कलासंवाद घडवून आणले आहेत. कोरोनावर कलेच्या माध्यामतून मात करण्यासाठीचं एक उत्साह वाढविणारं वेबिनार त्यांच्या मार्गदर्शनाखाली (मीही सहभागी झालो होतो त्यात) पार पडलं. त्यांनी त्यांच्या मूर्तामूर्त शिल्पशैलीचा आणि तंत्रवापराचे माध्यम काय आहे? म्हणजे धातू आहे की, दगड आहे की कॅनव्हास आहे की लाकूड वा माती? ही माध्यमं असतील, तर त्या माध्यमांच्या मुळाशी जाऊन त्या माध्यमांची प्रकृतीनुसार ते कला-ट्रिटमेंट कशी व कोणती घ्यायची, हे ते ठरवितात. ही ‘ट्रिटमेंट’ म्हणजे अगदी मरणासन्न एखाद्या रुग्णाला पुन्हा जीवनदान देणार्‍या निष्णात वैद्यापेक्षा कुठेही कमी नसते.


डॉ. पाचरणे म्हणूनच उत्तम ‘अ‍ॅकॅडेमिशियन’ ठरले ललित कलेचे! आणि कलाजगतातील एक ‘आयकॉन.’ अशा व्यक्तींचा खरंतर ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मान झाला, तर त्या व्यक्तीपेक्षा पुरस्काराचाच सन्मान ठरावा, अशी ही व्यक्ती आहे. डॉक्टर हे ‘सेलिब्रिटी’ नाहीत. त्यांना उगाच मिरवायला आवडत नाही. खांदे बदलणे, शब्दांना जादुईपणे पलटवणे वा तत्सम प्रचलित कलांपेक्षा, शब्दांना जागणे, आश्वासनांची पूर्तता करणे, कलाशैली व तंत्रांच्या उपासकांना पारदर्शीपणे व्यासपीठ निर्माण करुन देणे, अशा अनेक गुणांनी-कलागुणांनी युक्त असणार्‍या शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांना सुदृढ दीर्घायुष्यासह कलासृजनासाठी सुयश चिंतितो...!!

डॉ. उत्तम पाचरणे यांचा अल्पपरिचय


- ललित कला अकादमी, नवी दिल्ली, अध्यक्ष
- जनसेवा सहकारी बँक, बोरिवली- ४ वेळा संचालक
- कला अकादमी गोवा- सदस्य, अ‍ॅड्व्हायजरी कमिटी
- पु. ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमी- सदस्य, अ‍ॅड्व्हायजरी कमिटी
- बॉम्बे आर्ट सोसायटी - ३ वेळा अध्यक्ष (२३ वर्ष सदस्य)
- प्रदर्शने १९७८ पासून २०१० पर्यंत
- अनेक पुरस्कार, अनेक व्याख्याने, अनेक ठिकाणी मुख्य उद्घाटक, प्रमुख अतिथी, अनेक कॅम्स, अनेक कार्यशाळा
- युरोप, अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी, स्विल्झर्लंड बेल्जियम, नेपाळ, इस्रायल अशा अनेक देशांमध्ये कलाकार्य
- कलाकारांना अनेक ठिकाणी व्यासपीठ मिळवून दिले.

- गजानन शेपाळ

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.