नाशिकहून बोरिवली नॅशनल पार्कात पाच बिबटे दाखल; रेस्क्यू सेंटर 'हाऊसफुल' होण्याच्या वाटेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
leopard _1  H x
 


महिन्याभरात पाच बिबट्यांची रवानगी 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नाशिकमध्ये सुरू असलेल्या मानव-बिबट्टया संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पिंजराबंद केलेल्या एका नर बिबट्याला शुक्रवारी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) दाखल करण्यात आले. देवळाली कॅम्प परिसरामधून बुधवारी या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरात नाशिकमधून बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पाच बिबट्यांना दाखल करण्यात आले असून आता याठिकाणी बिबट्यांना ठेवण्यासाठी जागेची समस्या निर्माण होऊ लागली आहे.



 
नाशिकमधील दारणा नदीच्या १२ किमीच्या परिसरातील ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये डिसेंबर, २०१९ पासून मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. या संघर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आजवर ५ मानवी मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात नाशिक पश्चिम वन विभागाने सात बिबट्यांना जेरबंद केले आहे. बुधवारी पहाटे देवळाली कॅम्प परिसरातील धोंडी रोडवरील सैनिकी वसाहतीत लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या पकडला गेला. त्यानंतर गुरुवारी सकाळी दारणा नदीच्या काठावरील चांदगिरी गावातील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचे पिल्लू सापडले. हे पिल्लू नर जातीचे एक ते दीड वर्षांचे असल्यामुळे आम्ही त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती नाशिक पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. तर देवळाली कॅम्प हा परिसर मानव-बिबट्या संघर्ष सुरू असलेल्या परिसरापासून २ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या भागात बुधवारी जेरबंद करण्यात आलेला प्रौढ नर बिबट्या मानवी हल्लांमध्ये कारणीभूत असल्याची शक्यता असल्याने आम्ही त्याची रवानगी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केल्याची माहिती भदाणे यांनी दिली. 


गेल्या महिन्याभरात नाशिकहून बोरिवली नॅशनल पार्कमधील 'बिबट्या बचाव केंद्रा'त पाच बिबट्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये दोन प्रौढ नर-मादी आणि सहा ते दीड वर्षापर्यंतच्या बिबट्याच्या तीन पिल्लांचा समावेश आहे. त्यामुळे २४ पिंजरे असलेल्या या केंद्रात आता १७ बिबटे असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सिंह-व्याघ्र सफारीचे अधिक्षक विजय बारब्दे यांनी दिली. बिबट्यांचे वास्तव्य असलेल्या पिंजऱ्यांची स्वच्छता करताना त्यांना दुसऱ्या पिंजऱ्यांमध्ये हलवावे लागते. त्यामुळे उरलेले सात पिंजरे या कामासाठी वापरणे आवश्यक असल्याने यापुढे नाशिकहून बिबटे आल्यास जागेची चणचण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

 
नाशिकहून नॅशनल पार्कमध्ये दाखल झालेल्या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंंरक्षक (वन्यजीव) पश्चिम सुनील लिमये यांनी दिली. तसेच यापुढे ज्याठिकाणी बिबटे पकडण्यात येत आहेत, तिथेच त्यांचे नियोजन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबादच्या 'सेन्टर फाॅर सल्युलर अॅण्ड माॅलेक्युलर बायोलाॅजी' मधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिकमधील बिबट्याच्या मानवी हल्ल्यांसाठी प्रौढ नर बिबट्या कारणीभूत असल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यांत मृत पावलेल्या चार व्यक्तींच्या शरीरावर लागलेली बिबट्याची लाळ तपासून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@