मुंबई पोलिस सुशांतची केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत : विकास सिंह

    दिनांक  30-Jul-2020 16:41:14
|
Sushant _1  H x


रिया विरुद्ध अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही; सुशांतच्या वकिलाचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी वांद्रा पोलिसांच्या डीसीपींकडे रियाविरुद्ध तक्रार केली होती, परंतु तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नाही, म्हणून पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


सुशांतची केस लढणारे वकील विकास सिंह यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया विकास सिंह यांनी दिली आहे.


दरम्यान, विकास सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ३८ लोकांची चौकशी केली. मात्र, या चौकशीतून काहीही साध्य झालेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत केवळ मोठ्या हस्तींनाच चौकशीसाठी बोलावल आहे. परंतु, सुशांतच्या आसपास असलेल्या लोकांची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी अजून ३०६ कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे कदाचित मुंबई पोलिस या प्रकरणाला घराणेशाहीच्या दिशेने वळवून दाबायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी ते नकार देत आहेत. मात्र, असे असले तरी आम्ही या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढू, असे देखील विकास सिंह यांनी म्हंटले आहे.


विकास यांनी स्पष्ट केले की, सुशांतच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरायला त्यांना बराच काळ लागला. मुंबई पोलिस त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे तक्रार दाखल करायला दीड महिना लागला. त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिस सुशांतच्या कुटुंबावर मोठमोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा उल्लेख करण्याचा दबाव आणत आहेत. मुंबई पोलिस हा तपास दुसर्‍या दिशेने नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.