'न भूतो न भविष्यती' भूमिपूजन सोहळा राज्यात विनाअडथळा पाहता यावा

    दिनांक  30-Jul-2020 13:17:37
|

tushar bhosale_1 &nbमुंबई :
श्रीराममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ५ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्याही गावाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच सर्व कर्मचारी-अधिकारी यांना हा सोहळा पाहण्यासाठी कामकाजातून सूट देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.


या पत्रात ते म्हणतात, हिंदु समाजाचा ४९२ वर्षाचा श्रीराममंदिराचा संघर्ष समाप्त होऊन अयोध्येत रामजन्मभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. हा दिवस हिंदु समाजासाठी ऐतिहासिक व सुवर्णमयी असणार आहे. देशासह महाराष्ट्रातील भाविक जनतेचे डोळे हा सोहळा पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. कोरोना संकटामुळे या सोहळ्यात अयोध्येत जाऊन सहभागी होता येणार नसल्याने हा आनंदाचा व उत्साहाचा सोहळा सर्वांना पाहता यावा, याकरिता दूरदर्शनसह अन्य खाजगी वाहिन्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणार आहेत. अशावेळी त्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाला तर जनतेचा प्रचंड हिरमोड होईल. असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत त्यांनी पत्राद्वारे ५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्याही गावी, वाडी-वस्तीवर संपूर्ण दिवसभरात कधीही वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, देखभाल-दुरुस्तीची कामे त्याआधी किंवा नंतर करावीत अशी मागणी केली आहे.
पुढे ते म्हणतात, ५ ऑगस्ट हा कामकाजाचा दिवस असल्याने राज्यातील असंख्य शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचारी या दिवशी आपापल्या कामावर रुजू असतील. 'भूतो न भविष्यती' असा हा सोहळा पाहण्याची त्यांची ही इच्छा असल्याकारणाने अल्पसंख्याक समाजाला त्यांची प्रार्थना करण्यासाठी कामकाजातून सूट दिली जाते त्याच धर्तीवर ज्या कर्मचारी,अधिकारी यांना हा सोहळा पाहावयाचा असेल त्यांना कामकाजाच्या वेळत हा भूमिपूजन सोहळा पाहण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच संबंधित विभागांना सूचना देण्याचे आवाहनही केले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.