'घराबाहेर पडताच' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांशी सामना

30 Jul 2020 10:54:26

cmo_1  H x W: 0


मुंबई :
राज्यावर कोरोनाचे संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असतानाही मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला नसल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील.



मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी १२.१५ वाजता त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल. या बैठकांना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार तसंच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. मग संध्याकाळी पाच वाजता ते मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती मिळते.



पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. तरीही मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा राजकीय दृष्टीकोनातूनही लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता आहे.
Powered By Sangraha 9.0