जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघाची नाटयगृहे सुरु करण्याची मागणी!

30 Jul 2020 15:44:22

Shivaji mandir_1 &nb



नाट्यगृह सुरु झाल्यास, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ३ लाख कुटुंबाना मदत होईल!


मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झालेला महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अनलॉक म्हणत काही गोष्टी राज्यात पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. अनलॉक अंतर्गत सुरु होणाऱ्या नवीन टप्प्यातही नाट्यगृहांविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघा’तील सर्व सभासदांची एक झूम मिटींग झाली.


त्या मिटींगमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन मार्च २०२० पासून बंद असलेला नाटय व्यवसाय सर्व गोष्टींची काळजी घेऊन कसा सुरु करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर एक आराखडा बनविण्यात आला आणि त्या संबधीचे विस्तृत निवेदन राज्याचे सांस्कृतिक सचिव यांना देण्यात आले आहे. या निवेदनात खालील मुद्द्यांचा विचार करून राज्यातील नाटयगृहे सुरु करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.


१) रंगमंच कामगारांना प्रयोगापूर्वी सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
२) प्रत्येक नाटयगृहांमध्ये नाटकाचे रोज दोनच प्रयोग होतील.
३) प्रत्येक कलाकाराचे मेकअप किटही वेगळं असेल.
४) नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था ही शासकीय नियमांना गृहीत धरूनच करण्यात येईल.
५) नाटकाच्या मध्यंतरात व नाटक संपल्यावर पोर्चमध्ये तसेच स्वच्छतागृहामध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना नाटकाचा प्रयोग सुरु होण्याआधी करण्यात येईल.
६) नाटकाच्या प्रयोगाची तिकीटविक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.
७) रसिक प्रेक्षकांनी नाटय प्रयोग सुरु होण्याअगोदर व प्रयोगानंतर कलाकारांना भेटायला येऊ नये अशी विनंती करण्यात येईल व गर्दी टाळण्यासाठी त्याचे गंभीरतेने पालनही करण्यात येईल.


या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यातील नाटयगृहे व्यवसायासाठी लवकर उपलब्ध व्हावीत जेणेकरून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या ३ लाख कुटुंबियांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होईल, अशा आशयाचे निवेदन लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष भेटीत देण्यात येणार आहे असे जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर, उपाध्यक्ष महेश मांजरेकर व कार्यवाह दिलीप जाधव तसेच निर्माते प्रशांत दामले, सुनील बर्वे, राकेश सारंग यांनी कळविले आहे.



Powered By Sangraha 9.0