लढवय्या उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020   
Total Views |

Ankush Shahane_1 &nb


काही महिन्यांत अंकुश शहाणे स्वत:च प्रकल्प तयार करुन देऊ लागले. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात तयार करुन दिले आहेत. अकोला, पंढरपूर, जळगाव, सांगली ते अगदी पंतप्रधानांच्या मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येसुद्धा ‘गुरु इंटरप्रायझेस’ने जलशुद्धीकरणाचे प्लान्ट्स उभारलेले आहेत. या प्रकल्पांद्वारे तब्बल १५००च्या वर लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळालेले आहेत.


१९७०च्या दशकातला काळ. अवघा देश दुष्काळाने होरपळून निघालेला. महाराष्ट्रात असा भयंकर दुष्काळ पाहिला गेला नव्हता. यावेळी पाच वर्षांचा दत्तू आपल्या आईसह बुलढाण्यातून कामासाठी अकोल्याच्या वाडेगावमध्ये आला. पण, कामच काही मिळत नव्हतं. एवढ्याशा मुलाला काम तरी कोण देणार? आईला उपाशी ठेवायचं नव्हतं. दत्तूने अक्षरश: भिक्षा मागितली. पण, आपल्या आईला उपाशी राहू दिले नाही. कुणाच्या शेतावर, बांधावर राहून ती मायलेकरं कशीबशी जगू लागली. मोठा झाल्यावर पडेल ती कामे तो करु लागला. दरम्यान त्याचं रुक्मिणाबाईसोबत लग्न झालं. आता बायकोला आणि दोन लेकरांना सोबत घेऊन तो आयुष्याची लढाई लढत होता, हिंमत न हारता. खरंतर त्याच्यासाठी आत्महत्या करुन स्वत:पुरतं सगळं संपवून टाकणं सहजशक्य होतं. पण तो लढवय्या बाप होता. हाच लढवय्या गुण घेऊन त्या लढवय्या बापाचा बेटासुद्धा परिस्थितीशी झगडला. नेटाने उभा राहिला. कष्टाचं चीज झालं. त्या मुलाने स्वत:चा उद्योग उभारला. काही कोटी रुपयांची उलाढाल करणार्‍या उद्योगाचा तो मालक झाला. ही रोमहर्षक संघर्षगाथा आहे अकोल्यातील ‘गुरु इंटरप्रायझेस’च्या अंकुश शहाणेंची.


या लढवय्या दत्तू सखाराम शहाणेंचा अकुंश हा मुलगा. खर्‍या अर्थाने लढवय्या. आयुष्यात अशा काही घडामोडी झाल्या की दत्तूंना, बायको रुक्मिणाबाई आणि दोन मुलांसह खडतर आयुष्य जगावं लागलं. मात्र, दत्तू डगमगले नाही. काही दिवसांनी ते मिळेल ती कामे करु लागले. रुक्मिणाबाई आपल्या नवर्‍याला खंबीर साथ देत होत्या. चार घरची धुणी-भांडी करुन प्रपंचाला हातभार लावत होत्या. आपल्या आई-बाबांचं कष्ट अंकुश जवळून पाहत होता. जागेश्वर विद्यालयातून तो बारावीपर्यंत शिकला. ‘मेकॅनिक’ विषय घेऊन त्याने बारावी एमसीव्हीसी पूर्ण केली. बारावी झाल्यावर काही पैसे कमावणे अनिवार्य होते. अंकुश जळगावच्या एका कृषी विषयक खासगी कंपनीत ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून कामाला लागला. पगार होता फक्त सहा हजार रुपये. सेल्सचा एक वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर तो आयसीआयसीआय बँकेत काम करु लागला. तीन वर्षे तिथे अंकुशने नोकरी केली. याचदरम्यान तो शेअर मार्केटचं ट्रेडिंग करु लागला. आता नोकरी करायची नाही हे मनाशी त्याने पक्कं केलं होतं. कृषीक्षेत्रातली माहिती असल्याने सोयाबीन आणि तूरच्या खरेदी-विक्रीमध्ये नशीब आजमावयाचं त्याने ठरवलं. मात्र, या व्यवसायात त्याला तोटा सहन करावा लागला. लोकांचे पैसे देण्यासाठी त्याने तीन एकर जमीन विकली. आलेल्या पैशांतून लोकांची देणी भागवली. काही पैशांची बचत केली. अंकुशला ‘बिझनेस आयडिया’ ऑनलाईन पाहणं आवडायचं. अशीच एक आयडिया तो पाहत होता. जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाचा तो व्हिडिओ त्याने पाहिला. हाच व्यवसाय आपण करायचा त्याने मनाशी पक्कं केलं.
 
संपूर्ण माहिती त्याने गोळा केली. संबंधितांशी संपर्क साधला. एकंदर चार लाख रुपयांचा प्रकल्प त्याने उभारला. अकोल्यामध्ये ७०० चौरस फूट जागेत हा प्रकल्प त्याने सुरु केला. सुरुवातीला फक्त सहा माणसे त्याच्याकडे कामाला होती. एका वर्षांत १० लाखांची उलाढाल केली. सहा महिन्यानंतर हा प्रकल्प वाडेगावला हलवला. काही महिन्यांत अंकुश शहाणे स्वत:च प्रकल्प तयार करुन देऊ लागले. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात तयार करुन दिले आहेत. अकोला, पंढरपूर, जळगाव, सांगली ते अगदी पंतप्रधानांच्या मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येसुद्धा ‘गुरु इंटरप्रायझेस’ने जलशुद्धीकरणाचे प्लान्ट्स उभारलेले आहेत. या प्रकल्पांद्वारे तब्बल १५००च्या वर लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळालेले आहेत. या सोबतच ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असणारे सर्व सामग्री पुरवण्याचे काम आता ‘गुरु इंटरप्रायझेस’ करते. कोरोनाच्या काळातसुद्धा अंकुश शहाणे यांनी ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, सॅनिटायझरसारख्या आवश्यक वस्तूंची उलाढाल केली. यामध्ये ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली, सध्या त्यांनी परदेशातून धूम्रफवारणीचे १० यंत्र मागवलेले आहेत. आणखी ५० यंत्रे मागविण्याचा त्यांचा विचार आहे. या सगळ्या उद्योगाची एकूण उलाढाल काही कोटी रुपयांमध्ये होते. भविष्यात आयात-निर्यात व्यवसायात उतरण्याचा अंकुश शहाणे यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तरुणांना मार्गदर्शन करुन त्यांच्यातून उद्योजक घडविण्याचा त्यांचा मानस आहे. अंकुश शहाणेंचा विवाह २०१५ रोजी रुपाली या सुविद्य तरुणीसोबत झाला. अभिजित (गुरु) नावाचा गोंडस मुलगा आज या दाम्पत्यांना आहे. लढवय्या हा आपल्या वडिलांचा गुण अंकुश यांनी आत्मसात केला. या जोरावर ते कोट्यवधींची उड्डाणे घेऊ शकले. एवढं असूनसुद्धा त्यांचे पाय मात्र आजही जमिनीवर आहे. हा उद्योजक असाच यशाची शिखरे पादाक्रांत करत राहो, ही सदिच्छा.

@@AUTHORINFO_V1@@