'शेषनाग' रेल्वेने मोडीत काढला 'सुपर अनाकोंडा'चा विक्रम

    दिनांक  03-Jul-2020 14:19:01
|

sheshnag_1  H x
नागपूर :
आजपर्यंत आपण साधारणपणे आपण जास्तीत जास्त ३० ते ४० डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल २.८ किलोमीटर लांबीची आणि तब्बल २५१ डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. सुपर पायथन 'शेषनाग' असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. दक्षिणपूर्व मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गुरुवारी नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान ही रेल्वे धावली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या.रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. या रेल्वेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


शेषनाग रेल्वेची रचना कशी ?


२५१ डबे, व्हॅगन, ४ ब्रेक व्हॅन आणि ४ विद्युत लोको (इंजिन ) या खास ट्रेनला जोडण्यात आले होते. मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे २२ किलोमीटरचे अंतर ४५ मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन काल दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सोडण्यात आली. ती १ वाजून ५ मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करत ती चालवण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे.


एकाच दिवसात 'सुपर अनाकोंडा' रेल्वेचा विक्रम मोडला

दक्षिणपूर्व मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गुरुवारी नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान ही रेल्वे धावली. या रेल्वेने यापूर्वी धावलेल्या सुपर अनाकोंडा रेल्वेचा विक्रम मोडीत काढला आहे. शेषनागने सुमारे २६० किलोमीटरचा प्रवास ६ तासात पूर्ण केला. या रेल्वेला रुळावर चालविण्यासाठी त्यामध्ये ६००० अश्वशक्तीची क्षमता असणारी ४ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह्ज बसविण्यात आली होती, तर यापूर्वी धावलेल्या २ किमी लांबीच्या सुपर अ‍ॅनाकोंडा ट्रेनमध्ये ६००० अश्वशक्तीचे ३ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह्ज बसविण्यात आले होते. सुपर अनाकोंडा ट्रेनमध्ये १७७ भारित वॅगन होते. बुधवारी ३० जून रोजी सुपर अनाकोंडा रेल्वे धावली होती. सुपर अनाकोंडा ट्रेनमध्ये १५ हजार टनचे वजन होते. यातून एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वस्तूची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक करण्यात आली. त्याचा कमाल वेग ताशी ६० किमी होता. 'सुपर अनाकोंडा' ने आपला प्रवास २ :१५ तासात पूर्ण केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.