वीर भोग्य वसुंधरा ! जगभराने आपलं शौर्य पाहिले : पंतप्रधान मोदी

    दिनांक  03-Jul-2020 15:19:08
|


pmo_1  H x W: 0लेह :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे. मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, वीर भोग्य वसुंधरा ! म्हणजेच वीर आपल्या शस्त्राच्या सामर्थ्याने मातृभूमीचे रक्षण करतो. ही भूमी वीरांची आहे. आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठी आहे. जगभराने आपले शौर्य पाहिले  असून घराघरात आपल्या शौर्याच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशाला आपला अभिमान असून आपल्या पराक्रमाची गाथा सर्वत्र गायिली जात असल्याचे मोदींनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्यात शहीद जवानांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण केली.
विस्तारवादाचा काळ मागे सरला ; आता विकासवादाचा काळ

तर लडाखमध्ये चीनच्या कुरापतींवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, "विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे." वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते." चीन कायमच लडाख, अरुणाचल प्रदेशातील काही परिसरावर आपला दावा सांगत असतो. इतकेच नाही तर रशिया आणि भूतानच्या काही क्षेत्रावरही चीनने आपला दावा सांगितला आहे.


तैनात असलेल्या उंच ठिकाणापेक्षा तुमचे शौर्य उच्च आहे व निश्चय गलवान खोऱ्यापेक्षाही बळकट

पुढे शहीद जवानांचे स्मरण करत मोदी म्हणतात, "देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही तैनात असलेल्या उंच ठिकाणाापेक्षा तुमचं शौर्य उंच आहे. तुमचा निश्चय गलवान खोऱ्यापेक्षाही बळकट आहे. तुमचे हात तुमच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांसारखे बळकट आणि मजबूत आहेत. तुमची इच्छाशक्ती या पर्वत रांगांपेक्षा दृढ आहे.आज प्रत्येक भारतीय तुमच्यासमोर म्हणजेच देशाच्या वीर सैनिकांसमोर नतमस्तक होत आहे. आज प्रत्येक भारतीयांची छाती तुमच्या शौर्य आणि पराक्रमाने फुलून आली आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचे असते. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचले तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच मोदींनी चीनला इशारा दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.