मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस ; हवामान विभागाचा अलर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |

mumbai rain_1  



मुंबई
: मागील काही दिवसांपासून शांत असलेला पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. पुढच्या २४ तासात कोकण, मुंबई काही भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी ट्विट करत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.



मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. मुंबई शहर व मध्यवर्ती भागात हलका ते मध्यम (७० मिमी) पावसाची नोंद झाली. आज हवामान विभागाने मुंबई व ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दक्षिण मुंबई म्हणजेच कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. आयएमडीने मुंबईला व किनारपट्टीवर २४ ते ४८ तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे.



हवामान विभागाकडून रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये ४ जुलैला तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायगडमध्येही पाऊस असाच हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा याभागात ३ , ४ आणि ५ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
@@AUTHORINFO_V1@@