पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

03 Jul 2020 16:08:36

Mumbai _1  H x






मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या पावसानंतर अधून मधून पडणारी सर वगळता महिनाभर ओढ लावलेल्या पावसाने आज मुंबईत खरीखुरी हजेरी लावली खरी, पण त्या पावसाने मुंबई पालिका प्रशासनाचे नालेसफाईचे दावे फोल ठरवले. उघडीप देत संततधार कोसळणाऱ्या पहिल्याच पावसाने मुंबई पाण्याने भरली. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.


भाजपचे मुंबई प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी तुंबलेल्या पाण्याबाबत प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले आहेत. विरोधक केवळ ३० ते ४० टक्के नालेसफाई झाल्याचे सत्य समोर मांडत असताना सत्ताधाऱ्यांकडून १०० टक्के नालेसफाईचा दावा करण्यात येत होता, तर प्रशासन त्याही पुढे जात ११२ टक्के नालेसफाईचे चित्र उभे करीत होते. मात्र आजच्या उघडीप देत पडलेल्या संततधार पावसाने हे सर्व दावे फोल ठरवले आहेत.


शिरसाट यांनी पाणी तुंबलेल्या सर्व ठिकाणांच्या नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय या नालेसफाईची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. हिंदमाता येथे ब्रिटानिया पंपिंग स्टेशनला चार वर्षे पूर्ण झाली. येथे एक थेंबही पाणी तुंबणार नाही असा प्रशासनाचा दावा होता. तर सत्ताधाऱ्यांची पाणी न तुंबण्याची डरकाळी होती. मात्र पहिल्याच पावसात दावा फोल ठरला आणि डरकाळी हेत विरली. सकाळी पाऊस पडत असताना येथील पंपिंग स्टेशन बंद होते, असे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढणाऱ्या पादचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. आत्ताच तर पाऊस सुरू झाला आहे. एवढ्यातच मुंबई पाण्यात, प्रशासन कोमात आणि कंत्राटदार मात्र जोमात असल्याची टिप्पणी शिरसाट यांनी केली आहे.



तुंबईची ठिकाणे


१) हिंदमाता,

२) दादर-माटुंगा,


३) गांधी मार्केट-किंग्जसर्कल,

४) शीव 

५) सांताक्रूझ-मिलन सबवे,

६) अंधेरी,

७) मालाड,

८) बोरिवली
Powered By Sangraha 9.0