रेखा : संघ बागेतील विकसित रोपटे

    दिनांक  03-Jul-2020 21:50:28   
|

rss rekha chavan_1 &


रेखा चव्हाणचे (राठोड) लग्न बालाजीबरोबर २८ जूनला यमगरवाडी येथे झाले. कन्येचा विवाह होणे, यात विशेष काय? दरवर्षी असे लाखांनी विवाह होत असतात, त्यातील हा एक विवाह. अशा प्रत्येक विवाहाचे सार्वजनिक कौतुक करीत नाही, तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परंतु, रेखाचा विवाह, म्हटला तर सामान्य विवाह आहे, पण तो तसा नाही.


कोरोना महामारीच्या संकटात हा विवाह यमगरवाडी येथे झाला आणि या विवाहासाठी मुंबई, पुणे, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून अनेकजण आले. भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक गेले, भिवंडीहून डॉ. सुवर्णा रावळ गेल्या. डॉ. शहापूरकर, महादेवराव सरडे, लातूरहून उदय लातुरे आणि विवेक अयाचित अशी किती नावे सांगावीत, ही सर्व मंडळी लग्नाला आली. रेखा कुणी ‘सेलिब्रिटी’ नाही, राजघराण्याची नाही, श्रीमंतांची लेक नाही आणि मोठ्या घराण्याची लेक नाही. पण, ती मोठ्या घराण्याची लेक नाही, असे कसे म्हणणार? ती संघ घराण्याची आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी यमगरवाडी येथे भटके-विमुक्त मुलामुलींच्या विकासासाठी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाची ती कन्या आहे. केवळ शब्दार्थाने नाही, तर वास्तविक अर्थाने ती प्रकल्प कन्या आहे, ती एकटीच नाही, अशा अनेक कन्या आहेत. ‘संघ म्हणजे समाज’ या अर्थाने ती समाज घराण्याची कन्या आहे. यमगरवाडीत ती, तीन भावंडांना घेऊन आली. तिच्या येण्याची एक कथा आहे. किनवटच्या बसस्थानकावर आपल्या भावंडांसहित भीक मागताना संघ प्रचारक गिरीश कुबेर यांनी तिला पाहिले, चौकशी केली आणि तिचे दु:ख त्यांना समजले. किनवटच्या बसस्थानकावर भीक मागताना अनेकांनी तिला पाहिले असेल. कुणी भिक्षा दिली असेल, कुणी शिव्या दिल्या असतील. गिरीश कुबेर यांनी आत्मियता दिली आणि ती भावंडांसहित यमगरवाडी प्रकल्पात आली. येताना तिचे नाव होते, रेखा राठोड. अनेक वर्षांनंतर लक्षात आले की तिचे नाव ‘राठोड’ नसून ‘चव्हाण’ आहे आणि कागदोपत्री तसे नाव आपण बदलून घेतले.
 
एक बहीण, दोन भाऊ, त्यात लहान भाऊ केवळ दोन महिन्यांचा, आई-वडील नाहीत. नातेवाईक जवळ करायला तयार नाहीत, काय झाले असते या सर्वांचे? यमगरवाडीत ती आली आणि त्यातून आजची फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी रेखा घडली. बहीण शीतल पोलिसी प्रशिक्षण घेत आहे आणि तिसरा भाऊ अर्जुन डॉक्टरकीचे शिक्षण घेत आहे. दोन महिन्यांचा होता त्या रामूने आता दहावीची परीक्षा दिली आहे. या चारही भावंडांना एका परिवाराने सांभाळणे फारच अवघड होते, प्रकल्प म्हणजे संघटित शक्ती. ‘संघटन में शक्ती है’ हा शाखेत खेळला जाणारा एक खेळ आहे. त्या शक्तीचे प्रत्यंतर म्हणजे या चव्हाण बांधवांचा विकास आहे. या मुलांचा सांभाळ प्रकल्पातील सर्वांनी केला. सुजाता गणवीर, सरस्वती माने, उमाकांत आणि त्याची पत्नी, सर्व शिक्षक मंडळी, कार्यकर्ते मंडळी, या सर्वांचा उल्लेख केला तर रेल्वेच्या मालगाडीचा डबा तयार होईल. सांभाळ करण्याची जबाबदारी आमच्यावर का, असा विचार कुणाच्या मनात आला नाही. का नाही आला? आपला समाज तर जातीत विभागलेला आहे. आलेली ही चार भावंडे, त्यांच्या सांभाळ करणार्‍यांच्या ना जातीची, ना पातीची, ना रक्ताची. नावावरून जाती ओळखण्याचा पुरोगामीपणा संघात शिकविला जात नाही. एकच संस्कार होतो, तो म्हणजे, ‘हा माझा आत्मीय समाज आहे. ही सर्व माझी भावंडे आहेत. मी त्यांचा, ते माझे आहेत,’ ही आत्मिय भावना हाच यमगरवाडीचा आधार आहे. रेखाची जात कोणती, ती दलित की आणखी काही, या विचाराला थारा नाही.
 
सध्या ’Black Lives Matter' हा विषय गाजतो आहे. भारतातील डावे लोक आम्हाला सांगतात की, एससी, एनटी, हे वेगळ्या वंशाचे लोक आहेत, काळ्या वंशाचे लोक आहेत. गोर्‍या लोकांचे आर्य त्यांच्यावर अत्याचार करतात, ते वाचले की, आम्हाला हसू येते, त्यांच्या बुद्धीची कीव येते. यमगरवाडीत असणारी सगळी मुले आणि मुली वेगळ्या वंशाची कशी, रेखाचा वेगळा वंश कसा असेल? आमच्या सर्वांची आई एक, ती म्हणजे भारतमाता. या भारतमातेची आम्ही सर्व लेकरं. या लेकरांमध्ये जन्मसिद्ध भातृभाव, भगिनी भाव, येथे कुणी अनाथ नाही, आम्ही सर्व सनाथ आहोत. या भावनेमुळेच रेखा आणि यमगरवाडीतील अन्य कन्या दिवाळीत अनेक परिवारात जाऊन राहतात. एकात्मतेचा अनुभव घेतात. आपण सर्व एक आहोत, आपल्या सर्वांची सुख-दु:खे समान आहेत, ती आपण वाटून घेतली पाहिजेत, हा संस्कार सहजपणे निर्माण होतो. रेखा लग्नाची झाली, आता तिचा विवाह करुन देणे हे प्रकल्पाचे कर्तव्य झाले. आपल्या भावी पतीचा शोध रेखाने अगोदरच करुन ठेवला होता. बालाजीशी लग्न करण्याचा तिचा निश्चय ठाम होता. त्यात अडचणी अनेक होत्या. पण, प्रेमाचा मार्ग काट्याकुट्यातूनच जातो. रेखाच्या जीवनाची हीसुद्धा एक स्वतंत्र कहाणी आहे, चित्रपटाला विषय देणारी. अडचणीतून वाट काढण्याचे काम सुवर्णा रावळ आणि विजय पुराणिक यांनी केले. बालाजीच्या माता-पित्याची संमती मिळवली आणि लग्न झाले.
 
विवाह म्हटला की खर्च आला. अगदी साधेपणाने लग्न करायचे म्हटले तरी लाख-सव्वा लाख खर्च होतात. २५ हजार रुपये कन्येने दिले, तिचे नाव लिहीत नाही. नाव लिहिले तर ती रागवेल आणि लेख वाचल्यानंतर पहिला फोन करील. अन्य भावंडांनीही खर्च केले. हा आपल्या परिवारातील विवाह आहे, ही यामागची भावना आहे. हे सर्व लिहीत असताना मन भूतकाळात कधी गेले कळले नाही. हा एक देश आहे, हे एक राष्ट्र आहे, त्याची प्राचीन संस्कृती आहे, कुणी घडवली ही संस्कृती? व्यास हे एका कोळीणीचे पुत्र आहेत. महर्षी वाल्मिकी जे एका कनिष्ठ जातीतील आहेत. सत्यकाम जाबाल हे दासीपुत्र आहेत. ऐतेरेय ऋषी हेदेखील दासीपुत्र आहेत. श्रीकृष्ण गवळ्याच्या घरी वाढला. रोहिदास चर्मकार आहेत. गाडगेबाबा परीट आहेत. राज्यघटना देणारे बाबासाहेब सवर्ण नाहीत. हे आणि असे असंख्य या देशाची संस्कृती घडविणारे आहेत. रेखा ज्या पारधी समाजातून आलेली आहे, त्या पारध्याची स्मृती म्हणून महाशिवरात्री या देशात साजरी केली जाते. मध्यंतरीच्या काळात सर्व घडी विस्कटली आणि हे आमचे समाजबांधव आजच्या भाषेत ‘दलित’ झाले. ते खरं म्हणजे देशनिर्माते आणि संस्कृतीनिर्माते आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना सक्षम केले पाहिजे. त्यांच्या अंगभूत गुणांनी त्यांना वाढू दिले पाहिजे. याच लोकांमध्ये उद्याचे व्यास, वाल्मिकी, आंबेडकर आहेत. रेखा आणि तिची भावंडे गुणी आहेत, क्षमतावान आहेत, बुद्धिमान आहेत. यमगरवाडीने त्यांच्या गुणांचा विकास केला. आधीचेच जे आहे, त्याला वाढू दिले. वेगवेगळ्या खेळात या भावंडांनी पारितोषिक जिंकली आहेत, स्पर्धा जिंकल्या आहेत. हे सर्व आम्ही नाही घडवलं, जे मुळात होत, त्याच्या विकासाची अनुकुलता निर्माण केली. समाजाची पुनर्रचना प्रबंध लिहून, ग्रंथ लिहून, सेमिनार करुन होत नाही. अशा हजारो-लाखो रेखा विकसित कराव्या लागतात. अशा देशव्यापी विकसित संघ बागेतील रेखा एक विकसित रोपटे आहे. तिची वाढ बघताना आम्ही सर्व कृतार्थतेच्या आनंदात जातो.
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.