सत्संग बरवा...

29 Jul 2020 22:59:28


jakhadi_1  H x
 

सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. मुमुक्षूला ज्या पारमार्थिक गोष्टी कठीण आहेत असे वाटत होते, त्या त्याला जमू लागतात. यासाठी समर्थांनी संतांची संगती करायला आग्रहपूर्वक सांगितले आहे.

 

संसार सुखाची अभिलाषा, वासनांची धुंदी तसेच दुर्गुणात मदमस्त असा हा ‘बद्ध’ अहंकाराने मायेच्या पाशात अडकलेला असतो. तो त्याचे स्वत:पुरते एक स्वार्थी जग तयार करतो. त्याच्या पलीकडे जाऊन हा ‘बद्ध’ वेगळा विचार करु शकत नाही. अशावेळी परिस्थितीचे चटके सहन करुन त्रिविविधतापाने पोळल्यावर ‘बद्धा’ला पश्चाताप होतो. पूर्वायुष्यातील कृत्यांबद्दल त्याला उपरती होते. पूर्वी केलेली पापे आठवून आपण सर्वांना कसे तुच्छ लेखले, याचे त्याला वाईट वाटते. अहंकाराने वागून आपण अनेकांना दुखावले. अविवेकीपणे वागून लोकांची निर्भत्सना करण्यात आपण आनंद मानला. तरी परिणामत: त्यातून दु:खच वाट्याला आले. या सांसारिक गोष्टींतून आपल्याला सुख मिळू शकत नाही, हे त्याला कळून चुकते. ज्या संसारसुखाच्या आशेने तो प्रापंचिक गोष्टींच्या मागे धावत असतो, त्या सुखाची प्रत्यक्षात भेट होत नाही, असे त्याला दिसून येते. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला हवे ते सुखसमाधान यातून मिळणार नाही, याची त्याला खात्री पटते. आपल्या जीवनाच्या अपूर्णतेची त्याला जाणीव होते. त्याची ही अवस्था रामदास स्वामींनी अशी दाखवली आहे.
 


ज्याला प्रपंची उदास। मने घेतला विषयत्रास।
म्हणे आता पुरे सोस। संसारीचा॥ (५.८.४)

 


असा विषयत्रासाने उद्विग्न मुमुक्ष विचार करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की, मी वैतागलेला आहे, हे सारे मला नकोसे वाटू लागले आहे. पण, नि:स्पृह संत-सज्जनांच्या अंतरंगात समाधान आहे. ते त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत आहे. त्या स्थितीत मुमुक्षला संत-सज्जनांची आठवण येते आणि संतसंगाची इच्छा त्याच्या मनात निर्माण होेते. दासबोधात समर्थांनी मुमुक्ष लक्षणे सांगताना संत-संगतीचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. तेव्हा समाधानी जीवनासाठी व पारमार्थिक प्रगतीसाठी संतसंगती, संताचा सहवास मिळणे आवश्यक आहे, हे मुमुक्षला पटते. आपला देहाभिमान, आपला कुलाभिमान, आपला पैसाअडका-श्रीमंती हे सारे विसरुन आत्मसमाधानासाठी तो संतांना शरण जातो.
 


देहाभिमान कुळाभिमान। द्रव्याभिमान नानाभिमान।
सांडूनि संतचरणीं अनन्य। या नाव मुमुक्ष ॥ (५.८.४०)

 


परमार्थमार्गात संतसंगतीचे महत्त्व निर्विवाद आहे. सत्संगती शिवाय आध्यात्मिक प्रगती होणे कठीण आहे, असाच आजवर अनेकांचा अभिप्राय आहे. संत तुकाराम महाराजांचा अनुभव असाच आहे. त्यांच्या एका अभंगात ते सांगतात.

 


संताचिया पायीं माझा विश्वास।
सर्वभावे दास जालों त्यांचा॥
तेंचि माझे हित करिती सकळ।
जेणे हा गोपाळ कृपा करी॥

 


आजच्या काळात सत्संगतीची महत्त्वाची अडचण म्हणजे खर्‍या संताला ओळखणे हे सोपे नाही. संत हे प्रसिद्धीपराड्.मुख असतात, असे नि:स्पृह संत समाजात आहेत. नाही असे नाही. परंतु, त्यांना शोधणे व त्यांचा सहवास, लाभ ही दुर्मीळ गोष्ट आहे. बरं, आध्यात्मिक वाटचालीसाठी नुसते संतांच्या सान्निध्यात येणे पुरेसे नाही. त्यासाठी संताने आपल्याला त्यांचा म्हटले पाहिजे, तरच त्यांच्या उपदेशाचा प्रेमळ दृष्टीचा आशीर्वादाचा अनुभव आपल्याला मिळतो. तेवढी चिकाटी आणि संयम सामान्य माणसाकडे नसतो, आजच्या गतिमान जीवनात तर अध्यात्मही लोकांना झटपट हवे आहे. अशा संतांच्या गुरुच्या शोधात लोक असतात. खरा संत-सज्जन अशा लोकांना दूर ठेवतो. या उलट काही स्वयंघोषित संत किंवा गुरु भाविकांना नादी लावतात. साधारण असे दिसून येते की, समाजातील काही लोक आकर्षक व्यक्तिमत्त्व, थोडेफार वक्तृत्व, संभाषण चातुर्य या भांडवलावर इतरांवर छाप पाडतात. ते स्वत:ला संत किंवा आध्यामिक गुरु मानून घेतात. अशा या स्वयंघोषित संत व गुरूंचे चेले आपल्या गुरुची महती इतरांना सांगत सुटतात. या गुरुंना ना अध्यात्माचा अनुभव, ना साधनेत, उपासनेत त्यांना रुची असते. आत्मप्रचिती नसल्याने इतर वाचलेली, ऐकलेली वचने ते उद्धृत करीत असतात. काही वेळा परस्परविरोधी विधाने केल्याने श्रोत्यांच्या शंकांचे ते निरसन करु शकत नाही. आध्यात्मिक क्षेत्रात असा हा ढोंगी वाढल्याने कुणाला संत म्हणावे, कुणावर विश्वास टाकावा, हे सामान्य माणसाला कळेनासे झाले आहे. आत्मप्रचितीशिवाय लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे हे अज्ञानी लोकांचे अज्ञान वाढवत आहेत. यासंदर्भात स्वामींनी दासबोधात एक छान ओवी लिहीली आहे. त्यात स्वामी म्हणतात, अरे, पोहणाराच जिथे गटांगळ्या खातो, {तथे तो इतर बुडणार्‍यांना कसा काय बाहेर काढणार?


पोहणाराचि गुचक्या खातो।
जनास कैसा काढू पाहतो ।
आशय लोकांचा राहतो ।
ठाईं ठाईं॥ (१७.४.४)


यालाच स्वत:ला अनुभव नाही. त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात. लोकांना योग्य उत्तर अथवा चांगले मार्गदर्शन मिळू शकत नाही. तेव्हा संतसहवास {मळण्यात येणार्‍या काही अडचणींची आपण चर्चा केली. तथापि, संतांच्या ग्रंथांचा सहवास मिळणे आपल्या हातात आहे. खरा संत शोधत फिरण्यापेक्षा संतांनी लिहिलेले ग्रंथ आपण सहज मिळवू शकतो. आध्यात्मिक ग्रंथ हे ग्रंथकर्त्या संताचे वाड्.मयीन स्वरुप असते. ग्रंथातील विचार समजून घेताना आपण त्या संताच्या सहवासात असतो. सद्ग्रंथांची सत्संगती आपल्याला घरबसल्या मिळणारी आहे. सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात, तर सत्संगतीमधील याहून चांगला पर्याय नाही. कोणत्याही संताचे अमरत्व त्याच्या ग्रंथात, त्याच्या विचारात असते. एका अर्थाने ग्रंथ ही त्या संताची वाड्.मयीन मूर्ती असते. समर्थांनी देह ठेवण्याच्या अगोदर त्यांचे निवडक शिष्य त्यांच्या भोवती जमा झाले. तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, “माझे हे पार्थिव शरीर, यापुढे दिसणार नाही. माझी वाणी ऐकू येणार नाही. तेव्हा मी गेलो असे तुम्ही म्हणाल. पण, तसे नाही. मी आहे.

‘जगज्जीवनीं निरंतर’ ”
त्यावर शिष्यांपैकी एक जण म्हणाले, “महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण तरीही यापुढे तुमचा उपदेश आम्हाला कसा ऐकायला मिळणार?” यावर समर्थ तत्काळ उद्गारले-


आत्माराम दासबोध। माझे स्वरुप स्वत:सिद्ध।
असता न करावा खेद। भक्तजनीं॥


येथे रामदासांना एवढेच निश्चयात्मक सांगायचे आहे की, दासबोधासारखा ग्रंथ ही त्यांची वाड्.मयीन मूर्ती असून ते देह सोडून गेल्यावरही त्यातील विचारांद्वारा त्याचा सहवासउपदेश भक्तांना मिळत राहणार आहे.
सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. मुमुक्षूला ज्या पारमार्थिक गोष्टी कठीण आहेत असे वाटत होते, त्या त्याला जमू लागतात. यासाठी समर्थांनी संतांची संगती करायला आग्रहपूर्वक सांगितले आहे.


जाणत्याची संगती धरावी। जाणत्याची सेवा करावी।
जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी। हळूहळू ॥ (१८.२.२)


संताचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच संतसंगतीमुळे आत्मज्ञानाची तळमळ शांत होण्यास मदत होते आणि साधकसिद्धाच्या दिशेने वाट चालू लागतो. संतांच्या ग्रंथसंगतीने आध्यात्मिक प्रगती साधता येते. तथापि संतांच्या तोंडून ब्रह्मज्ञान ऐकताना ग्रंथांतील गूढार्थ उलगडत जातो हे मात्र खरे.

 

- सुरेश जाखडी

 
Powered By Sangraha 9.0