मुंबई झोपडपट्टीत ५७ टक्के अॅन्टीबॉडीज विकसित

29 Jul 2020 14:18:27

antibody_1  H x

मुंबई :
राष्ट्रीय सरो सर्वेक्षणातून मुंबईत करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात मुंबईतील तीन स्थानिक वॉर्डांमधील झोपडपट्टी लोकसंख्येच्या ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे, तर शहरातील लोकसंख्येच्या १६ टक्के लोकांनी अॅन्टीबॉडीज तयार केल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. मुंबईतील चेंबूर, दहिसर व माटुंगा -वडाळा या भागात सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणात रक्तातील नमुन्यामुळे कोरोनाची लागण, कोरोनाचा फैलाव लोकांमध्ये कशा प्रकारे झाला याबाबत माहिती एकत्रित होणार असून सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी महत्त्व पूर्ण ठरणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.



आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १२ वर्षावरील व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. चेंबूर, माटुंगा- वडाळा व दहिसर या विभागातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चसह अन्य संस्थांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (अॅन्टीबॉडी) चे प्राबल्य आढळून आले आहे. मुंबईमध्ये सार्स-कोविड २ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्व्हेलन्स हा उपक्रम आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्‍त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान, प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.



नागरिकांमध्‍ये असलेल्या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य जाणून घेणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन कोरोनाचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्‍यास करण्‍यासाठी दोन फे-यांमध्ये सर्वेक्षण घेण्‍याचे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर- उत्तर, एम-पश्चिम आणि एफ- उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची परवानगी घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली, असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली. सर्वेक्षण अभ्यासाचा कालावधी जुलै २०२० या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील १२ ते १४ दिवसांचा होता. सर्वेक्षणामध्ये निर्धारित लक्ष्यापैकी झोपडपट्टी भागातून १०० टक्के तर बिगर झोपडपट्टी भागातून सरासरी ७० टक्के प्रतिनिधी सहभागी झाले. ऍन्‍टीबॉडीजचे प्रमाण महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले असले तरी या तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
-झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त प्राबल्य आढळून येण्याचे कारण लोकसंख्येची घनता आणि सामुदायिक सुविधा (शौचालये, पाण्याची स्थळे) वापरणे हे देखील असू शकते.
- याठिकाणी सध्याचे प्राबल्य (अनुमानित) आणि महानगरपालिकेकडे नोंद असलेली मृत्यू प्रकरणे यांचा एकत्रित विचार केला असता, संसर्ग मृत्यू दर हा अतिशय कमी (०.०५- ०.१०%) असण्याची शक्यता आहे.
- बिगर झोपडपट्टी भागांमध्ये तुलनेने अधिक चांगले असलेले सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेमुळे व त्या सोबतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे देखील प्राबल्य कमी आढळले आहे.
- सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्यूनिटी) संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी शोधलेले सदर परिणाम महत्त्वाचे ठरतील. सामूहिक प्रतिरोधक शक्ती तयार होण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत प्राबल्य असले पाहिजे, हे अद्यापही निश्चित नसले तरी, लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्यामध्ये प्रतिरोधक शक्ती अस्तित्वात असेल आणि टिकून असेल तर निदान झोपडपट्ट्यांमध्ये तरी लवकरच हे कळून येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे, सर्वेक्षण केलेल्या तीनही विभागांमध्ये रुग्णप्रकरण मृत्यू दर (सुमारे ५-६ टक्के) याच्या तुलनेत संसर्ग मृत्यू दर हा कमी (०.०५-०.१०%) असू शकते.
Powered By Sangraha 9.0