'राफेल हिरो' मनोहर पर्रीकरांच्या आठवणीत नेटिझन्स भावुक

29 Jul 2020 19:00:33

manohar parrikar_1 &



मुंबई :
राफेल विमानं ७००० किलोमीटरचे अंतर पार करून भारतात दाखल झाले. भारताच्या हवाई दलाचे सामर्थ्य वाढविणारे व शत्रूंना धडकी भरवणारी राफेल विमान हरयाणाच्या अंबाला हवाई तळावर उतरविण्यात आले. यामुळे भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण शक्य करणाऱ्या आणखी एका नावाची चर्चा आज सोशलमिडीयावर होत आहे. या विमानांसाठी फ्रान्ससोबत करार करणारे तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीही नेटीझन्सकडून आज ताज्या झाल्या.





स्व.पर्रीकरांबद्दल देशवासीयांचे प्रेम आज ट्विटरवर जाणवू शकते ज्यात पर्रीकर यांनी राफेल करारावर स्वाक्षरी करतानाची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी कर्करोगामुळे निधन झाले. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे,"दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. आज भारत राफेल सारखी शक्तिशाली लढाऊ विमाने खरेदी करत आहेत. ही तेच आहेत ज्यांनी संरक्षण खरेदीसाठी अमेरिकन खात्यात ठेवलेल्या ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची आठवण करुन दिली."  





फेसबुकवर देखील मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. एका फेसबुक वापरकर्त्याने म्हटले की, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ते आज आपल्यात असायला हवे होते. त्यांचे प्रयत्न आणि वाटाघाटींमुळे हा राफेल सौदा शक्य झाला. आज ते जिथे कुठे असतील त्या ठिकाणी थोड्यावेळ थांबून ही उड्डाण करणाऱ्या ५ लढाऊ राफेलचे हवाई परिवहन आंनदाने पाहत असतील." अशाच भावुक प्रतिक्रिया देत भारतीयांकडून 'राफेल कराराचा हिरो', मनोहर पर्रीकरानाच राफेल समर्पित असे कॅप्शन देण्यात येत आहेत.ट्विटरवर मनोहर पर्रीकर यांचे फोटो राफेल विमानसोबत शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.



२३ सप्टेंबर २०१६ रोजी भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री ड्रियान यांनी करारावर सह्या केल्या होत्या. 'दसॉल्ट एव्हिएशन'सोबत भारत-फ्रान्स दरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी ७.८८ अब्ज युरोचा (सुमारे ५८,८५३ कोटी रुपये) करार झाला. तब्बल २० वर्षांनंतर भारताने लढाऊ विमानांसाठी एक मोठा आंतरराष्ट्रीय करार केला होता. पंतप्रधान मोदी यांनी युपीए सरकारच्या काळात झालेला राफेल खरेदीचा करार रद्द करुन नवा करार केला आहे. २०१६ मध्ये करार होताच अंदाज आला होता की राफेल विमान २०१९ मध्ये भारत येतील. तथापि, त्याचा कालावधी वाढला आणि आता ती प्रतीक्षाही आता संपली आहे. असे म्हटले जात आहे की, २०२१च्या अखेरीस सर्व ३६ राफेल विमान भारतात पोहोचतील.

Powered By Sangraha 9.0