'शिवसेना सध्या हवेत ; सरकार राज्याचं हित पाहत नाही'

    दिनांक  28-Jul-2020 12:47:49
|

ch patil _1  Hमुंबई :
शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही. स्वतंत्रपणेच निवडणुका लढवू, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हंटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यहिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही फॉर्म्युला केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो फॉर्म्युला मान्य झाला आणि केंद्राने आम्हाला या फॉर्म्युल्याचे पालन करण्याचे आदेश दिले तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ.आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात. पण शिवसेना सध्या हवेत आहे. त्यांना वाटतंय की स्वर्गाला बोटं टेकली आहेत. ते सध्या एकत्र यायला तयार होतील असं वाटत नाही.असेही ते म्हणाले.पुढे ते म्हणाले, उद्या आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारचं घेईल. एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि सोयीचे राजकारण करायचं हे राजकारण योग्य नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार होतो. पण शिवसेनेचा एकत्र यायला तयार नव्हती, असा आरोप करतानाच आमच्याकडे १०५ आमदार आणि त्यांच्याकडे ५६ आमदार असे असताना ते मुख्यमंत्रिपद मागूच कसे शकतात? असा सवाल त्यांनी केला. हितासाठी अवाजवी मागू नये, वाजवी मागावं. यावेळी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र शिवसेनेला ते मान्य नव्हते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना ते म्हणाले, चौथीतल्या मुलाला निबंध लिहायला सांगितला तरी तो लिहिल की सध्याचं सरकार राज्याचं हित पाहत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात." असेही पाटील म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.