रोहा बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या : दरेकर

    दिनांक  28-Jul-2020 19:12:30
|

Pravin Darekar_1 &nb
 
मुंबई : रोहा येथील बलात्कार व खून प्रकरणातील गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करून हा खटला जलदगतीने चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी केली. रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज तातडीने सकाळी त्या घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दुर्दैवी मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते आदी उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना गोठलेल्या आहेत. कारण राज्यात अश्या घटना रोज घडत असताना सरकारला मात्र अशा गंभीर घटनांची नोंद घ्यावीशी वाटत नाही. पोलिस प्रशासनावर सरकारचा कुठलाही वचक नाही व धाक राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर फावते आहे.”
 
“रोह्यामध्ये घडलेली ही घटना अतिशय हृदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य नराधामांनी केले आहे. एका निष्पाप मुलीवर नराधामांनी बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केली. राज्यामध्ये महिलांविरुध्द अशा भयंकर घटना रोज घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे, सरकारकडून कुठलेही भाष्य होत नाही. जनतेला आत्मविश्वास व धीर देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर व बाजारकामासाठी बाहेर जात असतात. पण आता या गंभीर परिस्थितीत वाड्या-वस्त्यांवरील आपल्या मुलींना, महिलांना घरातून बाहेर पाठवयाचे कसे, असा प्रश्न त्यांच्या आई-वडिलांना पडला आहे. कारण राज्यामध्ये भयावह वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणांची सरकारने दखल घ्यावी व या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करुन दोषींन कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करतानाच या प्रकरणात भाजपच्या वतीने चांगला वकील देण्यात येईल व मुलींच्या कुटुंबीयांना न्याय मिळून देण्यात येईल.” असेही प्रवण दरेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
तांबडी येथील त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या कुंटुंबीयांची दरेकर यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणातील दोषींना शासन होईलच असे आश्वासन कुटुंबीयांना देण्यात आले. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांबद्दल कुटुंबीयांच्या मनात शंका आहेत. कारण ती दुदैर्वी मुलगी खेळाडू होती. कबड्डी, कराटे खेळणारी होती, त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा असा अंदाज तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याची माहितीही दरेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.