कोरोना योद्धे बेस्ट कर्मचारी वाऱ्यावर : याचिकेद्वारे मागितली मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 





मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे बेस्टचे कामगार मोठ्या संख्येने मृत झाले असून त्यांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन याचना करण्यात आली आहे. त्यासाठी कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा द्यावा असे आवाहन बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीतर्फे शशांक राव यांनी केले आहे. आंदोलन किंवा संप पुकारल्याशिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही, हा आजवरचा इतिहास आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शांतपणे आपली मागणी कर्मचाऱ्यांनी मागितली आहे.


कोरोना काळात अत्यावश्यक सेवा करीत असताना बेस्ट उपक्रमाचे १३५० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह झाले असून, आतापर्यंत सुमारे १०७ कर्मचार्‍यांचे बळी गेले आहेत. बेस्टच्या ३४,००० कर्मचार्‍यांपैकी १०७ कामगारांचा मृत्यू हे प्रमाण देशाच्या मृत्युदराच्या तब्बल १३० पट आहे. शासन निर्णयानुसार मृतांच्या वारसांना देय ५० लाखांचे सानुग्रह अनुदान अद्याप एकाही वारसाला देण्यात आलेले नाही व ग्रॅच्युईटीसह इतर देयकेही देण्यात आलेली नाहीत.


कोविडशी लढा देताना मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसाला नोकरी देण्याचे बेस्टचे धोरण आहे, पण ९० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये वारसाला नोकरी देण्यात आलेली नाही. करोना व मृत्युचे वाढते भयावह प्रमाण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व करोनाग्रस्त कामगारांसाठी तात्काळ उपचारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही, असेही या याचिकेत म्हटले आहे.


लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे कामावर उपस्थित न राहू शकलेल्या कामगारांवर बडतर्फीची बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, तसेच केंद्र व राज्य शासनाचे आदेश डावलून बेकायदेशीर पगारकपातदेखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीतर्फे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आॅनलाईन पिटीशनद्वारे बेस्ट कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्या सादर करण्यात येत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी व कामगार वर्गाने उत्स्फुर्तपणे सदर पिटीशनला पाठींबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, आतापर्यंत १,२०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १६ कामगारांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार कामगारांनी कोरोनावर मात केल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बेस्ट कर्मचार्‍यांमधील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर ७० ते ७५ टक्क्यांच्या आसपास आहे, असेही बेस्टतर्फे सांगण्यात आले.



 
 
@@AUTHORINFO_V1@@