सुशांतसिंगच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या

    दिनांक  28-Jul-2020 11:10:52
|

parth pawar_1  मुंबई :
गेल्या काही दिवसात बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या चर्चेत राहिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी उडी घेतली आहे. पार्थ पवार यांनी मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. याप्रकरणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबतचे पत्र दिले आहे.पार्थ पवार यांनी हे पत्र लिहिल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचे आहेत असे असून देखील पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का? असा सवाल ही यामुळे उपस्थित होत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी गरज पडल्यास करण जोहरची चौकशी करू, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. महेश भट्ट यांनी देखील पोलिसात या प्रकरणी आपला जबाब नोंदवला आणि त्यातच पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकारणाची एक वेगळीच किनार लागली आहे.


पार्थ पवार यांनी लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या युवकांसाठी सुशांत एक आयडॉल होता. अनेक चाहत्यांनी याबाबत मला ईमेल्स, फोन, मेसेज केले, यात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेशमधील युवकांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. सुशांतला न्याय मिळवून द्यावा या युवकांच्या भावना योग्य आहेत असे त्यांनी सांगितले.तसेच देशातील अनेक युवकांचा आवाज म्हणून मी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करत आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, पण सुशांतला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची शिफारस करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे. तसेच या प्रकरणाशी जोडलेल्या भावना तुम्ही समजू शकता, सुशांतला न्याय देण्यासाठी तातडीने प्रयत्न कराल असा विश्वासही पार्थ यांनी व्यक्त केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.