सुशांत आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची पोलिस चौकशी!

27 Jul 2020 16:18:36

Mahesh Bhatt_1  


सांताक्रूझ पोलिस ठाण्यात २ तास चाललेल्या चौकशीत विचारले रिया आणि सुशांतच्या संबंधासंदर्भात प्रश्न!
 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास चौकशी केली. सुशांत आणि रियाच्या नात्याबद्दल पोलिसांनी महेश भट्ट यांना प्रश्न विचारल्याचे कळते आहे. दुपारी १२ वाजता महेश भट्ट पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि सुमारे दुपारी अडीचपर्यंत त्यांची चौकशी झाली. मात्र, पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे महेश भट्ट यांनी टाळले.

 
या चौकशी दरम्यान पोलिसांनी महेश भट्ट यांच्याकडे त्यांच्या आगामी ‘सडक २’ या चित्रपटाविषयी विचारपूस केली. या चित्रपटात पहिले सुशांतला कास्ट करण्यात येणार होते. असेही म्हटले जाते की, आलिया भट्टापूर्वी सुशांत सिंह राजपूतने रियाचे नाव महेश भट्ट समोर ठेवले होते. मात्र, नंतर हा चित्रपट आदित्य रॉय कपूरला ऑफर करण्यात आला. पोलिसांनी सुशांतला चित्रपटात न घेण्याचे कारणही महेश भट्ट यांना विचारले.

 
महेश भट्ट यांना चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पण मीडियाची गर्दी पाहून भट्ट यांनी पोलिसांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये येण्याची विनंती केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. याशिवाय आता धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणात व्यवसायायिक वैमनस्याच्या पैलूंवरही चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ३७ जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. गरज पडेल अशा सर्व जणांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.



 
 
Powered By Sangraha 9.0