मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च सुनावणी

    दिनांक  27-Jul-2020 11:07:54
|

maratha arkashan_1 &नवी दिल्ली :
मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवसात ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रलंबित मराठा आरक्षण मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


या तीन दिवसात दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी दीड-दीड दिवसांचा अवधी आहे. यापूर्वी १५ जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत, कोर्टाने कोणताही अंतरिम आदेश दिला नव्हता. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबतची मूळ याचिका हे दोन महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीत चर्चिला जाईल.


यापूर्वीच्या सुनावणीत काय झालं?


यापूर्वी १५ जुलैला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्ट काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नव्हती. कोर्टाने वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती न दिल्याने मराठा समाज आणि राज्य सरकारला मोठा दिलासा होता.


मुंबई हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध ठरवत मराठा आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. सुप्रीम कोर्टात अनेकदा सुनावणी झाली, पण कोर्टाने कधीच या आरक्षणाला स्थगिती दिली नाही.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या मराठा आरक्षणाला विरोध करत याचिका कोर्टात दाखल आहे. येत्या जुलै अखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आहे. १५ जुलै रोजीही मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. ७० ते ७५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे काही वकिलांनी नमूद केले. मराठा आरक्षणाच्या प्रकरणाने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाचा राजकीयदृष्ट्याही परिणाम होणार आहे. त्यामुळेच आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागतो हे अत्यंत महत्वाचे असणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.