शक्तिशाली ‘राफेल’ लढाऊ विमानांचे भारताच्या दिशेने उड्डाण!

27 Jul 2020 15:05:59
Rafale_1  H x W


फ्रान्सहून ७००० किमी अंतर कापत भारतात होणार दाखल!

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे बाहू भक्कम करण्यासाठी फ्रान्स येथून ५ रफाल विमानांची पहिली बॅच भारताच्या दिशेने निघाली आहे. फ्रान्सच्या हवाई तळावरून ७ हजार किमीचे अंतर पार करून हे विमान भारतात येणार आहेत. यात रीफिलिंगसाठी केवळ यूएईमध्ये विमान थांबतील. बहुप्रतीक्षित मल्टी-रोल फायटर जेट्सवर समस्त भारतीयांचे लक्ष लागले आहे. कोरोना महामारीमुळे या विमानांचे भारतात आगमन लाबले होते. या विमानांची शेवटची बॅच भारताला डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, चीनसोबत वाद सुरू असताना हे लढाऊ विमान लडाखमध्ये तैनात केले जाणार असल्याची शक्यता आहे.


भारतात येणारी रफाल लढाऊ विमाने आणखी शक्तिशाली बनवली जात आहेत. भारतीय हवाई दल यात हॅमर मिसाइल लावणार आहे. फ्रान्सने ही क्षेपणास्त्रे इतरांसाठी राखीव असली तरीही ते आधी भारताला देणार असल्याचे म्हटले आहे. हायली एजाइल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज अर्थातच हॅमर हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. फ्रान्सने हे नौदल आणि हवाई दलासाठी तयार केले आहे. हे हवेतून जमीनीवर मारा करतात. हॅमर मिसाइलने लडाखसारख्या डोंगराळ भागात मजबूत शेल्टर आणि बंकर सहज उद्ध्वस्त केले जाऊ शकतात.


भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये राफेल खरेदीचा करार झाला होता. यामध्ये ५८ हजार कोटींत ३६ राफेल विकत घेण्याचा करार झाला होता. ३६ पैकी ३० लढाऊ विमाने, तर ६ प्रशिक्षणार्थी विमाने असणार आहेत. तर, प्रशिक्षणार्थी विमानांमध्ये सुद्धा फायटर जेट्सचे फीचर देण्यात आले आहेत.




Powered By Sangraha 9.0