मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर!

27 Jul 2020 13:08:23
maratha arkashan_1 &



१ सप्टेंबरला मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार!


नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीला नवीन वळण मिळाले आहे. मराठा आरक्षणावर आजपासून नियमित सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाने १ सप्टेंबर रोजी यावर निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी तीन दिवसीय सुनावणीला सुरुवात झाली आहे.


मराठा आरक्षण प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावे का, यावर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपआपले मत द्यायचे आहे. जर घटनापीठाकडे प्रकरण गेले नाही तर १ सप्टेंबरपासून सुनावणी होईल. तर, १५ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही भरती करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनावणी सुरू होण्यास उशीर झाला. राज्य सरकारकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणे कठीण असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हे आदेश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना या अडचणी येत असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0