करण जोहर आदित्य ठाकरेंचा मित्र, पोलिस चौकशीला बोलवणार कसे? : कंगना राणावत

27 Jul 2020 13:47:31

kangana_1  H x



आदित्य ठाकरेंचा मित्र असल्याने करणची चौकशी होत नसल्याचा कंगनाचा आरोप

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवीन गोष्टी सध्या चर्चिल्या जात आहेत. या प्रकरणी अलीकडे बर्‍याच लोकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी करण जोहरच्या व्यवस्थापकाची चौकशी केली जाईल, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. हे समजल्यानंतर कंगना राणावतच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. याबाबत तिने मुंबई पोलिसांवरही रोष व्यक्त केला आहे. याच बरोबर करण, आदित्य ठाकरेंचा मित्र आहे म्हणून ही प्रकरण दाबले जात असल्याचेही तिने म्हंटले आहे.


टीम कंगनाने यासंदर्भात ट्विट केले आहे. 'करण जोहरऐवजी त्यांच्या व्यवस्थापकाला का समन्स बजावले?' असा प्रश्न या ट्वीटमधून विचारला गेला आहे. ‘करण जोहरला तपासापासून दूर ठेवण्यात आले आहे, कारण ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे' बेस्ट फ्रेंड' आहेत’, असा आरोपही यात करण्यात आला आहे. 'मुंबई पोलिसांनी एसएसआरच्या हत्येच्या तपासाची थट्टा करणे थांबवावे', असे म्हणत कंगनाने संतापही व्यक्त केला.







याआधीही गृहमंत्र्यांनी सदर प्रकरणी दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी केली जाईल असे म्हंटले होते. मात्र ते ही झालेले नाही. आता करण ऐवजी त्यांच्या मॅनेजरला समन्स पाठविले जातात. असे करून मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासाची थट्टा करत आहेत, असा संताप कंगनाच्या टीमकडून व्यक्त केला गेला आहे.


सुशांतच्या निधनानंतर कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये पोलिस करण जोहरची चौकशी का करत नाहीये? हा प्रश्न उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने करण व्यतिरिक्त आदित्य चोप्रा, राजीव मसंद आणि महेश भट्ट यांची नावेही गटबाजी करणा-यात जोडली होती आणि मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी करावी असे सांगितले होते. इतकेच नाही तर कंगनाने असेही म्हटले आहे की, जर ती आपले दावे सिद्ध करण्यास अक्षम राहिली तर ती आपला पद्मश्री पुरस्कार सरकारकडे परत करण्यास तयार आहे.







Powered By Sangraha 9.0