'स्मार्ट सिटी’ची स्मार्ट पहारेदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

saily lad_1  H


स्मार्ट शहरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पडणार्‍या नामांकित ‘वोक्सारा प्रायव्हेट लिमिटेड’च्या (Volksara Pvt. Ltd.) संस्थापिका सायली लाड यांचा प्रेरणादायी प्रवास...सायली लाड एक ध्येयवादी महिला उद्योजिका. कायम आपल्या नवनवीन संकल्पनांना सत्यात उतरवत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या, त्यांच्या प्रवासावर नजर टाकणारा हा लेख. वयाच्या बाराव्या वर्षी कौटुंबिक व्यवसायाचा भाग होण्याऐवजी सायलीने स्वत:चा व्यावसायिक पसारा उभारण्याचा निर्णय घेतला. पदव्युत्तर शिक्षण संपताच तिने भारतातील आयटी उद्योगांवर लक्ष केंद्रित केले. कारण, या क्षेत्राचा आवाका लक्षात घेता कल्पनांच्या माध्यमातून २०१४ मध्ये ‘वोक्सारा’ (Volksara Pvt. Ltd.) या कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला तिने ‘सर्व्हिलन्स सिक्युरिटी बिझनेस’वर लक्ष केंद्रित केले आणि त्यानंतर पुढील काही वर्षांतच तिच्या या कंपनीने १०० टक्के आयटी व्यवसायात अस्तित्व निर्माण केले.उद्योजकतेच्या मार्गावर वाटचाल करणारी सायली ही तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या वडिलांनी ‘क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनी’ची स्थापना केली. ही कंपनीदेखील काही वर्षातच ग्राहकांना विविध सेवा (एकात्मिक सुविधा व्यवस्थापन, विमानचालन सेवा इत्यादी) देणारी भारतातील एक नामांकित कंपनी ठरली. कुटुंबातील मोठी मुलगी म्हणून क्रिस्टलमधील सायलीची भूमिका मनुष्यबळ आधारित सेवा उद्योगातील नवीन विकासाच्या आणि व्यवसायाच्या विस्तारावर नजर ठेवणारी होती. सायलीने ’नॉटिंघॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी’ व ’स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कन्सल्टिंग’ या विषयात बीए आणि ‘रॉयल हेलोवे, लंडन विद्यापीठा’तून ‘बिझिनेस कन्सल्टिंग’मध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
‘वोक्सारा प्रायव्हेट लिमिटेड’ या सायलीच्या स्वतःच्या कंपनीची कहाणी तेव्हा सुरु झाली जेव्हा वडिलांसोबत लंडनला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचे वडील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याविषयी बोलत होते. इंग्लंडमधील छोट्या शहरांमध्ये स्मार्ट शहरांसाठीचा हा एक प्रकल्प होता. इथेच तिला आपल्या व्यवसायाची कल्पना मिळाली. एका मुलाखतीत सायली तिच्या शैक्षणिक जीवनातील आठवणी सांगताना म्हणते, “मला माझ्या संशोधनाचा विषय ‘पाण्याद्वारे निर्माण होणार्‍या विजेचे फायदे’ याबद्दल चर्चा करण्यांना प्रेरणा मिळाली. या विषयावर सेमावर काम करत असताना आम्ही पाठपुरावा केला. इंग्लंडमधील छोट्या शहरांमध्ये सुरू झालेला हा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प होता. या कल्पनेतून गती मिळाल्यानंतर आम्ही भारतीय प्रवाशांसाठी संभाव्य परिस्थितीविषयी चर्चा सुरू केली. वडिलांच्या पाठिंब्याने या सर्व कल्पना शक्यतांमध्ये रूपांतरित झाल्या आणि माझ्या कंपनीचा पाया घातला गेला.’’
भारतातील ‘स्मार्ट’ शहरांमध्ये ‘वोक्सारा’ आज सायबर सुरक्षितता अधिक मजबूत करण्याच्या दिशेने कार्य करीत आहे. तसेच सिस्टम इंटिग्रेटरसारख्या आयटी कंपोनंट्स क्षेत्रात व्यवसाय वाढविण्याचीदेखील त्यांची योजना आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘वोक्सारा’ तांत्रिक प्रगतीच्या मदतीने अधिक मजबूत सुरक्षा उपाय प्रदान करते. भारत सरकारने २०१५मध्ये १००स्मार्ट शहरे तयार करण्याची योजना आखली आणि मागणी वाढल्याने सायलीने या संधीचे सोने करत व्यवसायाची वृद्धी केली. मागणी वेगाने वाढत गेल्याने सायबर सुरक्षा सेवांसाठी हे अनोखे वरदान ठरले. कुंभमेळ्यात सायलीच्या कंपनीला एका मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. देशातील सर्वात मोठ्या धार्मिक कुंभमेळा प्रकल्पाबद्दल माहिती देताना सायली सांगते, “आमचा व्यवसाय स्टार्टअप स्वरूपात असतानाच पहिल्या सहा महिन्यांत ‘विप्रो’ने आमच्याशी करार केला. तेव्हा आमच्यासाठी कुंभमेळा हा पहिला मोठा कार्यक्रम होता. त्यावेळी ‘सेफ सिटीज’ प्रकल्पांतर्गत येणार्‍या सर्वात आधी निवडलेल्या शहरांपैकी हे एक होते आणि देशातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व होते.या प्रकल्पावर काम करत असताना, आम्ही नंबर प्लेट ओळखणे, लोकांची संख्या मोजणे यांसारख्या गोष्टींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी ‘आयसीसीसी’ व ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला. केवळ दोन महिन्यांत एवढा मोठा प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्याबद्दल आमचे खूप कौतुक झाले आणि ‘एफएसएएआय’ने या शहराला ‘बेस्ट इंडियन सेफ सिटीज’ने नामांकित केले. ही आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट होती.’’ गोंदिया आणि माथेरान, नाशिक, नामची आणि पिंपरी-चिंचवडसारख्या ‘स्मार्ट’ शहरांच्या सुरक्षितेसाठी अनेक वर्षांपासून ‘वोक्सारा’ संबंधित आहे. सायली सांगते, “आम्ही तेल आणि वायू उद्योगात आणि विमानतळांवर बरेच प्रकल्प केले आहेत. माझ्यासाठी सर्वात मोठा प्रकल्प मुंबई विमानतळ होता. तेथे ८५ कॅमेरे बसविले ज्यांचे वजन सुमारे ३५ किलो होते आणि त्या प्रत्येकात २०लेन्स होत्या. ज्या २.१३ किलोमीटरच्या परिघात पसरल्या होत्या. यात ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) उड्डाण ते बेल्ट, विमानाचा लॅण्डिंग पॉईंट तपासणे तसेच लागू असल्यास पार्किंग पेनल्टी देण्यासाठी वापर होत असे.’’सायलीने आजपर्यंत इतके यशस्वी मार्गक्रमण करूनही तिच्या समोर आजही सर्वात मोठे आव्हान आहे. ते आव्हान म्हणजे ‘स्त्री’ म्हणून तिला या क्षेत्राने स्वीकारण्याचे. ही समस्या केवळ व्यावसायिक क्षेत्रातच नाही तर आयटी उद्योगातही आहे. ती म्हणते, “ही एक कठीण लढाई असूनही समाधानकारक आहे.’’ मार्च २०२०पर्यंत ‘वोक्सारा’ची कमाई १५० कोटी रुपये इतकी आहे, तर मार्च २०२१चा अंदाज सुमारे ३००कोटी रुपये इतका आहे. सायलीकडे भविष्यातील अनेक महत्त्वाकांक्षी योजना आहेत. ती म्हणते, “आम्ही नवीन तांत्रिक उत्पादनांच्या संशोधन आणि विकासासाठी उत्पादन युनिटदेखील स्थापित करत आहोत. आमच्या ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या आणि प्रभावी सेवा मिळाव्यात यासाठी हे प्रामुख्याने एआय आणि मशीन लर्निंग उद्योगावर लक्ष केंद्रित करेल.’’ सायलीचा हा प्रवास भविष्यात यशस्वी महिला उद्योजक होऊ पाहणार्‍या व त्या दिशेने प्रवास करणार्‍या महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल!
@@AUTHORINFO_V1@@