मुंबईतील सात विभागात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

    दिनांक  26-Jul-2020 15:51:08
|

covid 19 death _1 &n


मुंबई :
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून २३ जुलैपर्यंत ५७३० मृत्यू झाले आहेत. यातील पालिकेच्या २४ विभागांपैकी सात विभागात २६१६ जणांचे कोरोनाने मृत्यू झाले आहेत. मृत्यूंची ही आकडेवारी पाहिल्यास सुमारे ४० टक्क्यांहून अधिक मृत्यू अंधेरी पूर्व, धारावी- दादर, कुर्ला, भांडूप, वरळी, वांद्रे -खार पूर्व, घाटकोपर या विभागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईत पहिला रुग्ण ११ मार्चला आढळून आला. चारच महिन्यात मुंबईत कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. २२ जुलैला मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख २ हजार ८८२ वर पोहचला होता. त्यापैकी ७६ हजार १८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५७३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २० हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण होते.२२ जुलैला मुंबई महापालिकेच्या २४ विभागात एकूण ५७३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी अंधेरी पूर्व येथील के ईस्ट विभागात ४३५, धारावी, दादर - माहीम येथील जी नॉर्थ विभागात ४२३, कुर्ला येथील एल विभागात ३९१, भांडूप विक्रोळी येथील एस विभागात ३७८, वरळी डिलाईट रोड येथील जी साऊथ विभागात ३३२, वांद्रे खार पूर्व येथील एच ईस्ट विभागात ३२९ तर घाटकोपर येथील एन विभागात ३२८ अशा सात विभागात एकूण २६१६ मृत्यूंची नोंद झाली आहे.मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु

पालिकेच्या रुग्णालयात रात्री १ ते पहाटे ५ या दरम्यान ऑक्सिजन काढून रुग्ण शौचालयात जात होते. त्यावेळी ऑक्सिजन काढल्याने त्यांचा मृत्यू होत होता. आता रुग्णांच्या बेडजवळच शौचालयाचे भांडे देण्यास सांगितले आहे. रुग्णांच्या मृत्यूचे व्हिडिओ ऑडिट करण्यासही सांगण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स, इतर कामगारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सर्वाना टीम म्हणून काम करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत नक्की घट होईल. रुग्णांचे निदान लवकर व्हावे म्हणून पालिका अँटीजन टेस्ट, डॉक्टर आपल्या दारी, आदी विविध उपाययोजना करत आहे. यामुळे वेळीच उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढेल असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
विभाग -- मृत्यू
अंधेरी पूर्व - के ईस्ट - ४३५
धारावी दादर - जी नॉर्थ -- ४२३
कुर्ला - एल -- ३९१
भांडूप - एस -- ३७८
वरळी - जी साऊथ -- ३३२
वांद्रे खार पूर्व - एच ईस्ट -- ३२९
घाटकोपर - एन -- ३२८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.