मुंबई महापालिकेकडून कोविड योद्ध्यांच्या चाचण्यांना सुरुवात

    दिनांक  26-Jul-2020 16:05:23
|

frontline warriors_1 मुंबई :
कोरोनाप्रतिबंधासाठी आघाडीवर असणाऱ्या कोरोना योद्ध्यांची अँटिजेन किटद्वारे तपासणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्‍यासाठी मागील चार महिन्यांपासून दिवस -रात्र लढा देणाऱ्या कोविड योद्ध्यांची ॲण्‍टीजेन कीट’ द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. यामध्‍ये सर्वांत आघाडीवर असलेल्‍या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची (फ्रन्‍टलाईन वॉरियर्स) कोरोना चाचणी करण्‍याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आरोग्‍य, स्‍वच्‍छता, मलनिःसारण यासह विविध खात्‍यातील कोविड १९ विषयक कर्तव्‍य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच पोलिस कर्मचाऱ्यांची देखील ‘ॲण्‍टीजेन कीट’ द्वारे चाचणी केली जाणार आहे.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्र व राज्‍य सरकार आदींनी निश्चित करुन दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वांनुसार या चाचण्‍या केल्‍या जाणार आहेत. महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्‍या हद्दीत स्‍थानिक पातळीवर शिबिरे आयोजित केली जातील. तसेच सुरक्षित अंतर  राखण्‍यासह सर्व मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे पालन करुन या चाचण्‍या केल्‍या जाणार आहेत.मुंबई महापालिकेची प्रमुख व उपनगरीय रुग्‍णालयांसह संपूर्ण मुंबईभर असलेली विविध आरोग्‍य केंद्र, दवाखाने, आरोग्‍य स्‍वयंसेवक, इतर आजारांच्‍या प्रतिबंधासाठी राबणारे आरोग्‍य कर्मचारी, घनकचरा व्‍यवस्‍थापन खाते अंतर्गत कार्यरत स्‍वच्‍छता कर्मचारी, झोपडपट्टीतील स्‍वच्‍छतेसाठी कार्य करणाऱया स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालक संस्‍थांचे कार्यकर्ते, मलनिःसारण व तत्‍सम कामकाज करणारे कर्मचारी यांच्‍यासह ज्‍या-ज्‍या खात्‍यांद्वारे प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कामकाज केले जात आहे, त्‍यांचे कर्मचारीवृंद या सर्वांचा या उपक्रमात समावेश असेल. तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक कामकाजामध्ये सक्रिय सहभाग देणा-या बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांचीदेखील चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.