तुम्हीही एसी बसने प्रवास करताय का ? वाचा काय आहे धोका !

    दिनांक  25-Jul-2020 19:46:56
|
BEST Bus_1  H x

कर्मचारी, प्रवाशांच्या जीवाशी बेस्ट प्रशासनाचा खेळ


मुंबई : बेस्टच्या ताफ्यात असलेल्या मिनी एसी बसेस कोरोनाच्या प्रसारक ठरत असल्याचा आरोप वाहतूक विभागातल्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझेशन आणि दोघांमध्ये अंतर हे दोन महत्वाचे नियम आहेत. शिवाय गर्दीत जाणे टाळणे हा तिसरा महत्वाचा निर्णय आहे. मात्र मिनी एसी बस प्रवासात या नियमानांच फाटा दिला जात आहे.


बेस्टच्या ताफ्यात असलेल्या मिनी एसी बसेस या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर घेण्यात आल्या आहेत. पॉईंट टू पॉइंट असल्याने त्या विदाऊट कंडक्टर धावतात. ड्रायव्हर ठेकेदाराचाच असतो. त्यामुळे स्वच्छ्तेच्या बाबतीत त्या बेस्ट उपक्रमाचे नियम पाळतातच असे नाही. त्यापैकी प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाइझ करण्याचा नियमही पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच कंडक्टरशिवाय बस धावत असल्याने प्रवासात सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याचेही आढळून येत आहे. एसीचे वातावरण कोरोनाला पोषक आहे. मात्र एसी बस चालवून आणि नियम मोडून बेस्ट प्रशासन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.


मुंबईत अनलॉक सुरू झाले असले तरी प्रवाशांच्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीची साधने सुरू झालेली नाहीत. लोकल अत्यावश्यक सेवेसाठीच धावत आहेत, तर बेस्ट बसेस पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर प्रत्येक थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली असते. सुरुवातीच्या थांब्यावर प्रवासी रांगेत बसमध्ये प्रवेश करत असले तरी तेथे डिस्टनसिंगच्या नियमांना तिलांजली दिली जाते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे.


एसी बसेस पॉइंट टू पॉइंट धावत असल्या तरी इतर बसेस सर्व थांब्यावरील प्रवाशांसाठी धावतात. मात्र प्रत्येक सीटवर एक प्रवासी आणि उभे पाच प्रवासी घेण्यात येत असल्याने, बसेस पहिल्याच थांब्यावर फुल्ल होतात. परिणामी मधल्या थांब्यावरील प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळत नाही. अनेक तास ते ताटकळत राहतात. बसेस थांब्याजवळ येण्यापूर्वीच डबल बेल होत असल्याने बसेस सुसाट जात असतात. एकादी बस थांबतेय अशी चिन्हे दिसताच प्रवेशद्वाराशी झुंबड उडते. येथेही सोशल डिस्टनसिंग फोल ठरते. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती उत्पन्न होते. शिवाय पाकिटमारांचेही फावते. त्यामुळे योग्य नियोजनाअभावी बेस्ट बसचा प्रवास कोरोनाला आमंत्रण देणारा ठरत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.