सिनेसृष्टीचा ‘दादा’माणूस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |
Dada kondake_1  



मराठी चित्रपटसृष्टीत आपला सुवर्णकाळ गाजवणारे मराठी अभिनेते-निर्माते तसेच रसिकांच्या मनात आजही घर करून राहणारे व विनोदी शैलीत द्विअर्थी संवाद हे ठळक वैशिष्ट्य असणारे एकमेव दिग्गज अभिनेते म्हणजे अभिनयसम्राट दादा कोंडके...




‘नायका’ला शोभेल अशी शरीरयष्टी नाही, प्रभावित करेल असे रूपही नाही. तरीही या अवलियाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ज्यांच्या नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हापुन्हा गर्दी करतात, अशा काही मोजक्या भाग्यवंत कलाकारांपैकी हे एक! त्यांच्या चित्रपटात ‘डबल मिनिंग’ची वाक्य असतात, म्हणून त्यांचा सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांशी नेहमी वाद होत असे. परंतु, ही कलाकार व्यक्ती जबरदस्त बुद्धिमान होती, ते बोलता बोलता असा शब्द फिरवत की, ऐकणारा आपण आधी काय ऐकले, यावर विश्वास ठेवू शकत नसे. वरळीच्या ‘करिअर डबिंग स्टुडिओ’मध्ये ‘ह्योच नवरा पाहिजे ‘ या चित्रपटाचे डबिंग चालू होते, तेव्हा तिथली एक आठवण आहे. बलात्काराच्या प्रसंगाचा सीन होता. हा सीन जयश्री टी जी या चित्रपटाची नायिका होती आणि मोहन कोठीवान या दोघांचे डबिंग चालू होते. त्यावेळी जयश्रीबाई यांनी उत्तमपणे डबिंग केले. तेव्हा हा अवलिया कलाकार पटकन तीन शब्दांचा एक वाक्य म्हणाला आणि एकमेकांकडे चमकून पाहिले. तेव्हा या कलाकाराला लक्षात आले की, आपण भलतेच बोलून गेलो आणि क्षणार्धात त्या शब्दाची फोड अशी केली की, त्यांच्या वाक्याचा अर्थच बदलून गेला. अर्थात तो शब्द इथे सांगू शकत नाही. दुसरा प्रसंग नगारा वाजवण्याचा होता, स्टुडिओमध्ये नगारा नव्हता, मग करणार काय? क्षणार्धात हा कलावंत त्या माईकसमोर गेला, स्वतःचा शर्ट वर करून स्वतःचे पोट माईकसमोर आणून असे वाजवले की, नगार्‍याच्या आवाजाचे ‘फिलींग’ निर्माण झाले. असा हा अवलिया कलावंत. रेकॉर्डिंग रूममध्ये ते एका जागी स्वस्थ बसले नाही. ते सतत काही ना काहीतरी करत होते, कुणाला तरी सूचना देत होते, तर कुणाशी बोलत होते. मराठी चित्रपटसृष्टीत आपला सुवर्णकाळ गाजवणारे मराठी अभिनेते-निर्माते तसेच रसिकांच्या मनात आजही घर करून राहणारे व विनोदी शैलीत द्विअर्थी संवाद हे ठळक वैशिष्ट्य असणारे एकमेव दिग्गज अभिनेते म्हणजे अभिनयसम्राट दादा कोंडके...


मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके’ या नावाने ते सुपरिचित. दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्ररत्नाचे ‘कृष्णा’ म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद त्यांना काही शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे, हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात ’बँडवाले दादा’ या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. ‘सुपरस्टार’ झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत. बालवयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीतलेखन व गायनाचे कौशल्य अवगत झाले. ते अनेक वाद्येही वाजविण्यास शिकले. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणात मात्र फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी संपर्क आला. त्यातूनच ते ‘राष्ट्र सेवा दला’शी जोडले गेले. अंगच्या उपजत कलागुणांमुळे त्यांना ‘राष्ट्र सेवा दला’च्या कलापथकात काम मिळाले. तेथे ते ‘शाहीर’ म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणे आदी कामे करू लागले. या काळात राम नगरकर, निळू फुले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते.


पथनाट्यात आपल्या विनोदाच्या ‘टायमिंग’वर हशा उसळवणार्‍या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत, दादांनी स्वतःचा फड उभारला. आता शाहीर दादा कोंडके वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे दीह हजारांहून अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. मराठी रंगभूमीवर दादांना मिळालेले यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दादांना त्यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात सहनायकाची भूमिका दिली. मात्र, हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अभिनेता सिनेमाच्या पडद्यावर लोकांना का आवडला नाही, असा प्रश्न भालजी पेंढारकरांना पडला होता. पुढे पेंढारकरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे दादांनी ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश व लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यानंतर एकापाठोपाठ ‘एक एकटा जीव सदाशिव’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘आली अंगावर’, ‘मुका घ्या मुका’, ‘मला घेऊन चला’, ‘पळवा पळवी’, ‘येऊ का घरात’, ‘सासरचं धोतर’, ‘वाजवू का?’ तसेच हिंदी चित्रपटांमध्ये ‘तेरे मेरे बीच में’, ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’, ‘आगे की सोच’, ‘खोल दे मेरी जुबान’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘गनिमी कावा’ या अन्य एका मराठी चित्रपटात तसेच मेहुलकुमार दिग्दर्शित ‘चंदू जमादार’ व ‘राम राम आमथाराम’ या दोन गुजराती चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अत्यंत साधे कथानक, ठसकेबाज आणि ग्रामीण बाजाची गाणी, विनोदी सादरीकरण यांमुळे दादांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. मराठीतही चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक आहे, हे दादांच्या चित्रपटांनी दाखवून दिले.


१९७१ ते १९९७ या तब्बल २६ वर्षांच्या कालखंडात, दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत होते. या कालखंडात दादांच्या चित्रपटांवर ना हिंदी सिनेमांचा परिणाम झाला ना दूरचित्रवाणीच्या आगमनाचा! आकर्षक गाणी, उडत्या चाली व धमाल संवाद यांसोबतच दादांनी त्या काळच्या प्रचलित धारणांनुसार जो अनाकर्षक नायक उभा केला, तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, साधाभोळा पण बोलण्यात फटकळ असा हा नायक सर्वार्थांनी वेगळा होता, म्हणूनही त्याला खर्‍या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता. दादांच्या चित्रपटांमुळे पूर्णत: डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपटनिर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरणप्रणालीपासून सर्वच यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वत:चे वेगळेपण दाखवले होते. त्यांची स्वत:ची ‘कामाक्षी’ नावाची चित्रपट-वितरण संस्था व ‘सदिच्छा’ नावाची चित्रपटनिर्मिती संस्था होती. उषा चव्हाण या नायिकेबरोबर त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या चित्रपटांत आईचे पात्र निभावणार्‍या रत्नमालाबाई, संगीतकार राम-लक्ष्मण, पार्श्वगायनासाठी महेंद्र कपूर यांचा आवाज आदी घटकही तितकेच लोकप्रिय ठरले. १९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची ‘हाईप’ इतकी झाली होती की, खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की, ‘बॉबी’ प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. ‘बॉबी’ गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. १९७५ मध्ये ‘पांडू हवालदार’च्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी अशोक सराफ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.


दादा कोंडके यांचे ओळीने नऊ चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. त्यांच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड बुकात झाली आहे. बहुजन समाजाच्या अभिरुचीची नाडी नेमकी ओळखून सर्वसामान्य प्रेक्षकांना रुचतील, असे ग्रामीण बाजाचे विनोदी चित्रपट निर्माण केल्याने त्यांनी अफाट लोकप्रियतेचा एक उच्चांकच प्रस्थापित केला. त्यांच्या निधनानंतर ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. ‘एकटा जीव’ हे अनिता पाध्ये यांनी शब्दबद्ध केलेले त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय ठरले. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, याची चांगलीच जाण त्यांना होती. ‘कमरेखालचे विनोद’ असे हिणवणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघतात. दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे, हे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा चार चित्रपटांची निर्मिती केली. दादांना एका भविष्यावाल्यांनी सांगितले होते, “तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही.” परंतु, दादा चाळीपासून शिवाजी पार्कमध्ये मोठ्या बंगल्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती. दादांचे हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख (त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.


मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय म्हटले की एकच नाव आठवते ते म्हणजे अभिनेता दादा कोंडके. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा, ही त्यांची खास हातोटी. ‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा ‘कॉपीराईट’च! मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट ‘सुपरहिट’ ठरले. ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तिरेखा हा त्यांच्या चित्रपटाचा बाज. शहरी जीवन, त्यातून आलेला बकालपणा, ग्रामीण जनतेची शिक्षित वर्गाकडून होणारी कुचंबणा हे त्यांच्या चित्रपटाचे विषय असत. मराठीत निर्मिती केलेल्या सर्वच चित्रपटात ‘सबकुछ दादा’च असत. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच कामे ते स्वत: करत. मात्र, त्यांचा मोठेपणा असा की, सर्व कामे स्वत: करूनही त्याचे श्रेय ते एकटे कधीच घेत नसत, तर सोबतच्या मंडळींना त्याचे श्रेय ते देत असत. त्यांच्या चित्रपटांमध्ये झळकणार्‍या पाट्यांमधूनही ते दिसते. दादा कोंडके यांच्यावर खूप काही लिहू शकतो, परंतु एकच सांगतो, ‘परत दादा कोंडके होणे नाही.’ दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी दादरला त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि मराठी चित्रपटाला संजीवनी देणारा निर्माता, कलाकार आपल्यातून निघून गेला. अशा दिग्गज कलावंताला मनापासून सलाम.



- आशिष निनगुरकर
@@AUTHORINFO_V1@@