नाशिकमध्ये मानव-बिबट्या संघर्षामधून वीस दिवसात ४ बिबटे कैद; बोरिवली नॅशनल पार्कमध्ये रवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

leopard _1  H x



पकडलेल्या बछड्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नाशिकमध्ये चिघळलेल्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने गेल्या वीस दिवसांमध्ये चार बिबट्यांना पिंजराबंद केले आहे. सिन्नर ते एकलहरे दरम्यानच्या परिसरामधून पकडलेल्या या बिबट्यांची रवानगी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' (नॅशनल पार्क) करण्यात आली आहे. पकडलेल्या चार बिबट्यांपैकी तीन बिबटे हे बछडे असून ते मानवी हल्ल्यांसाठी कारणीभूत नसल्याची शक्यता असल्याने त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी होत आहे.
 
 
 
नाशिकमधील दारणा नदीच्या १२ किमीच्याा परिसरातील ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये डिसेंबर, २०१९ पासून मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. या संघर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आजवर ५ मानवी मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने गेल्या दीड महिन्यापासून या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये २ जुर्लै पासून २३ जुर्लैपर्यंत चार बिबटे सापडले. यामध्ये ३ वर्षांची मादी आणि सहा ते बारा महिन्यांदरम्यानचे दोन नर आणि एक मादी बछडा पकडले गेले. या सर्वांची रवानगी बोरिवली नॅशनल पार्कमधील 'बिबट्या बचाव केंद्रात' करण्यात आली आहे. मात्र, मानवी हल्यांसाठी हे चारही बिबटे कारणीभूत नसल्याची दाट शक्यता आहे.
 
 
 
 
हैद्राबादच्या 'सेन्टर फाॅर सल्युलर अॅण्ड माॅलेक्युलर बायोलाॅजी' मधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मानवी हल्ल्यांसाठी प्रौढ नर बिबट्या कारणीभूत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यांत मृत पावलेल्या चार व्यक्तींच्या शरीरावर लागलेली बिबट्याची लाळ तपासून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे पकडलेल्या चार बिबट्यांपैकी किमान तीन बछडे या हल्ल्यांसाठी कारणीभूत नसल्याची शक्यता असल्याने त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे.
 
 
 
हल्ल्यांसाठी कारणीभूत असणारा नर बिबट्या अजूनही पकडला गेला नसल्याने दारणा नदीच्या परिसरात २० पिंजरे कार्यान्वित असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. तर, बोरिवली नॅशनल पार्कमधील 'बिबट्या बचाव केंद्रा'त नाशिकवरुन चार बिबटे दाखल झाल्याने आता केंद्रामध्ये केवळ दोन बिबट्यांना ठेवण्यापुरतीच जागा शिल्लक असल्याची माहिती अधिक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी दिली.
 
 
 
जनजागृतीव्दारे मार्ग

मुंबई आणि जुन्नरमध्ये निर्माण झालेला मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न हा जनजागृतीच्या माध्यमातून सोडविण्यात आला. त्यामुळे जनजागृतीद्वारेच नाशिकमधला प्रश्नही आपल्याला सोडवता येऊ शकतो, अशी भावना वन्यजीव संशोधिका डाॅ. विद्या अत्रेय यांनी व्यक्त केली. नाशिकमधला मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न दहा ते पंधरा वर्ष जुना आहे. शिवाय सद्यस्थितीत सातत्याने झालेल्या हल्ल्यांमुळे समाजात रोषही असल्याने वन विभागाची मोहिम पार पडल्यानंतरच जनजागृती अभियान राबवता येईल, असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे मानव-बिबट्या संघर्षांच्या प्रश्नाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन' आवश्यक आहे. आम्ही तो २०१५ साली तयार करुन वन विभागाला सुपूर्द केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नसल्याची माहिती अत्रेय यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@