विमा, बँकींग क्षेत्रात जपानी गुंतवणूक आणण्यासाठी सुरेश प्रभूंचे प्रयत्न

24 Jul 2020 14:12:12

Suresh Prabhu_1 &nbs




नवी दिल्ली : इंडो-युएस बिझनेस समीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर माजी वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी जपानच्या उत्पादन व सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी भारतात यावे यासाठी आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे चीनच्या विश्वासार्हतेबद्दल सर्व जगाला चिंता व्यक्त केली जात आहे, अशा स्थितीत भारत हा एक विश्वासार्ह पर्याय निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 
भारतात अद्यापही विमा क्षेत्र, बँकींग क्षेत्रासह कृषी, दुग्धव्यवसाय क्षेत्रातही मोठ्या संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जपानने भारतातून मांस, डेअरी पदार्थ, कृषीपुरक उद्योगांसाठी आयात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारत हा जपानी उत्पादन कंपन्यांसाठी भविष्यात मोठी बाजारपेठ ठरेल, एकत्र येऊन रणनितीपूर्ण तसेच व्यवासायिक धोरणे आखण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण आशिया क्षेत्राच्या विकासासाठी उभय देशांची ही भागीदारी महत्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले.


या वेबिनारमध्ये JETRO, JICA आणि JCCII आदी कंपन्यांचे प्रमुखही उपस्थित होते. भारत आणि जपानने एकत्र येऊन भविष्यात विकास आणि वृद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय औद्योगिक संघटना सीआयआयतर्फे हे वेबिनार घेण्यात आले होते. राजन लालवानी यांनी सुत्रसंचालन केले. 



दरम्यान, जगातील बलाढ्य व गुंतवणूक क्षमता असलेला देश म्हणून जपानकडे पाहिले जाते. सुरेश प्रभू यांनी जपानी उद्योजकांना विमा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी आवाहन केले आहे. अशाच प्रकारे कोरिअन व्यापार असोसिएशनलाही हे आवाहन केले आहे. कोरीअन चेंबर ऑफ कॉमर्स आणि उद्योग संघटनेशी १५ जुलै रोजी प्रभू यांनी संवाद साधला होता. या वेबिनारमुळे जपानी वित्तीय कंपन्या व बँकांनी भारतात गुंतवणूक वाढवल्यास भविष्यात मोठी संधी निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







Powered By Sangraha 9.0