कोरोना लढाईत प्लाझमा थेरपी’ रामबाण

24 Jul 2020 15:24:37

plasma donation _1 &


 
 
 



नवी मुंबई
: गेल्या काही महिन्यांपासून सर्व जगात ‘कोरोना व्हायरस’ वर औषध किवा लस शोधून काढण्याचे शास्त्रज्ञांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे भारतात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना येथे त्यांच्यावर उपचारांसाठी ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा थेरपी’ च्या रुपाने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. 


‘कोराना’ च्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णाचे थोडे रक्त काढून त्याचे पृथक्करण केले जाते व त्यातून रक्तद्रव ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ हा एक विशिष्ट द्रव पदार्थ मिळवला जातो. या ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ मध्ये रुग्णाच्या अंगातील रोगप्रतिकारक द्रव्य (प्रतिद्रव्य) असते. ते ‘कोरोना’ ची नव्याने लागण झालेल्यांवर उपचारासाठी उपय़ोगी पडते. एखाद्या व्यक्तीस ‘कोरोना’ची लागण झाली असेल, तर त्याच्या शरिरात बऱ्या झालेल्या रुग्णाच्या अंगातील ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ टोचल्यास, त्या लागण झालेल्याच्या शरिरात तात्काळ रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. ही पद्धत यापूर्वी सार्स, मर्स व एच1एन1 (स्वाइन फ्लू) या आजारांवर वापरण्यात आलेली आहे.


कोरोनाच्या आजारावर सध्या कोणतीही प्रमाणित उपचार पद्धती उपलब्ध नाही. त्यामुळे, कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा उपचाराचे प्रयोग करण्यात येत आहेत. या उपचाराने कोरोनाचा रुग्ण बरा होत असल्याचे काही अहवाल आलेले आहेत. या उपचाराच्या क्लिनिकल चाचण्यांचे निष्कर्ष भारतात सकारात्मक आले असल्याने कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी डॉक्टरांच्या हाती नवे आयुध आले आहे आणि रुग्णांनाही दिलासा मिळू लागला आहे. अर्थात, ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ मुळे आजाराचा कालावधी कमी होतो का, त्याची तीव्रता कमी होते का आणि मृत्यूदर घटतो का, हे तपासण्याचे काम आवश्यक आहे.


‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ ची उपचार पद्धती अजूनही संशोधनात्मक पातळीवर असल्याने कोरोनाच्या आजारावर तो रामबाण उपाय असल्याचे अद्याप म्हणता येत नाही. प्लाझमा संक्रमित करणे हे सुरक्षित असते आणि रुग्णाचे शरीर ते सहज स्वीकारते. काही प्रकरणांमध्ये त्याचा रुग्णांना लाभ झाला असल्याचे हाती असलेल्या पुराव्यांनुसार सांगता येते. कोरोनावर सध्या इतर कोणताही उपचार उपलब्ध नसल्याने, डीसीजीआय (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) यांनी कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा उपचाराचे प्रय़ोग काही गंभीर रुग्णांवर विशिष्ट परिस्थितीत करण्यास परवानगी दिली आहे. 


‘अपोलो हॉस्पिटल’ ने या ‘प्लाझमा थेरपी’ चे विविध स्वरुपाचे प्रयोग करण्याची परवानगी मिळवली आहे. रक्तापासून प्लाझमा वेगळे करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा अपोलो हॉस्पिटलमध्ये आहे. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन प्लाझमा दान करावे, अशी अपेक्षा आहे. इतर कोणत्याही उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कोरोनाबाधितांवर या दात्यांकडून घेतलेल्या प्लाझमाचा उपयोग करता येईल.


कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आणि रक्तदान करण्यास आता पात्र ठरलेल्या व्यक्तींकडूनच हे ‘प्लाझमा’ दान स्वीकारण्यात येते. संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे निदान प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून झालेले असावे, तसेच प्रयोगशाळांच्या इतर निकषांची पूर्तताही या व्यक्तीने केलेली असावी. ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझमा’ चे दान करण्याच्या किमान 28 दिवसांपूर्वी ही व्यक्ती कोरोनाच्या आजारातून संपूर्णपणे बरी झालेली असावी व तिच्यामध्ये आता कोणतीही लक्षणे शिल्लक असू नयेत. या संभाव्य प्लाझमादात्यांच्या कोरोनाच्या प्रतिद्रव्याबाबतच्या व इतरही चाचण्या घेण्यात येतात. 









Powered By Sangraha 9.0