पीएमसी बँकेचे अन्य बँकेत विलीनिकरण करा !

24 Jul 2020 15:08:55

PMC _1  H x W:





मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचे दैनंदिन व्यवहार तत्काळ सुरू करण्यासाठी अधिक विलंब न लावता ही बँक अन्य बँकेत विलीन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार रविंद्र वायकर यांनी रिझर्व बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 



देशातील सर्व को ऑप बँकांना आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. पंजाब आणि महाराष्ट्र को.ऑप. बँकेतील आर्थिक घोटाळ्यामुळे आरबीआयने २३ सप्टेंबर २०१९ रोजी बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर सहा महिन्यांचे निर्बंध घालते होते. त्यानंतर या निर्बंधाची मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली. आता पुनश्‍च निर्बंधाची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. तब्बल ९ महिन्याचा कालावधी उलटला तरी पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचे दैनंदिन व्यवहार अद्याप सुरळीत सुरू करण्यात आलेले नाही. 



पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील आर्थिक घोटाळ्याची माहिती मिळताच बँकेतील अनेक खातेदारांनी आपले हक्काचे पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेतली होती. परंतु खात्यातून ठराविक रक्कम काढण्याचे निर्बंध आरबीआयने घातल्याने खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक पगारदार नोकर, निवृत्त कर्मचारी यांचे पेन्शनचे खाते, ज्येष्ठ नागरीक, विधवा यांनी आपल्या आयुष्याची पुंजी या बँकेत ठेवली असून ती आर्थिक निर्बंधामुळे अडकून राहिली आहे.



अनेक रुग्णांना तर उपचारासाठी आपल्या हक्काचे पैसेही काढता येत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना उपचार करणे अशक्य झाले आहे. अशावेळी अधिक वेळ न घालवता पंजाब आणि महाराष्ट्र बँकेला अन्य बँकेत विलीन करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी तसेच बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरू करुन खातेदारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी केली आहे.



Powered By Sangraha 9.0