‘कलापुरातील सहजकलायोगी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

art _1  H x W:


प्रा. जी. एस. माजगावकरांइतका प्रगल्भ, अफाट कलाभान, अदम्य कला प्रतिभा असणारा हा कलातपस्वी पुरुष सांगली-कोल्हापूरच्या पुढे तुलनेने अज्ञात का राहिला असावा? कलाजगताहूनही बाह्यजगताशीही अशा प्रामाणिक कलासाधकाचा परिचय व्हायलाच हवा, असं मला वाटतं.



पुण्याची एकेकाळी ‘विद्येचं माहेरघर’ अशी ओळख होती. आता ही ओळख बदलत चालली आहे. पण, ‘कोल्हापूर’ अर्थात ‘कलापूर’ची ओळख अजूनही बदललेली नाही, ही कौतुकाची बाब आहे. आजही कोल्हापूरला ‘कलानगरी’ या नावानेच ओळखले जाते. कोल्हापूर म्हटलं की चित्रपटसृष्टी, चित्रकार-शिल्पकारांच्या कलाप्रतिभेने भारलेला परिसर..!! आजही कोल्हापूरला अनेक कलाकारांच्या साधनेमुळे वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. सांगलीचे सेवानिवृत्त प्राचार्य हे दररोज कोल्हापूर-सांगली व परत असा प्रवास करायचे. वास्तविक त्यांचे इतरही सहकारी हे ये-जा करायचे आणि शनिवार-रविवार आला की कोल्हापूरला जायचे. प्रा. माजगावकर हे रोज कोल्हापूरला एवढ्याचसाठी जायचे की तेथे म्हणजे कोल्हापूरला, ज्येष्ठ चित्रकार रवींद्र मिस्री, ज्येष्ठ चित्रकार गणपतराव वडणगेकरांसारख्या दिग्गजांना जवळून भेटता येतं, त्यांच्या कलाशैली आणि तंत्रांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने प्रा. माजगावकर यांचं सांगलीचं कलाविश्व कलामहाविद्यालय ते कलापूर असा रोजचा दिनक्रम असायचा.



१९८१ पासून त्यांनी जवळ जवळ डझनभर तरी समूह प्रदर्शने आयोजित केली. त्यांचे मित्र चित्रकार गुलझार आणि चित्रकार मुकुंदराव देशमुख अशी या तिघांची विशिष्ट ओळख झालेली होती. असे हे त्रिदल बराच काळ कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. प्रा. जी. एस. माजगावकर यांचे मुंबईत जहांगिर कला दालनात २०१८साली प्रदर्शन होते. माजगांवकर आणि निसर्गचित्रणे असं जरी समीकरण असलं तरी त्यांच्या निसर्गचित्रणात यथार्थतेपेक्षा प्रयोगशीलतेतून लाभलेल्या अद्भुत परिणामांचा अधिक प्रभाव दिसून येतो. हे त्यांचं नेहमीचं वैशिष्ट्य असतं की, त्यांच्या निसर्गचित्रणातील निसर्ग हा नैसर्गिक बारकाव्यांचा नसतो, तर माजगावकरांना, त्यांच्या डोळ्यांना जे दिसते, तसेच ज्याची अनुभूती येते, तेच त्यांच्या चित्रात दिसते. रुपाकारांचे सुलभीकरण, स्वैर सादरीकरण आणि निरागस रंगभावांचे दर्शन या सार्‍यांचं अवतीर्ण होणं इतकं सहज असतं की, रापणकारांच्या... ‘सहजयोगाच्या’ व्याख्येप्रमाणे ‘माजगांवकरी-सहजयोग’ त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसतो. मग प्रत्येक नैसर्गिक घटक हा त्यांच्या सहजतेच्या स्वर्गीय अनुभवातून व्यक्त होताना दिसतो. जहांगिरला आयोजिलेल्या २०१८च्या प्रदर्शनातील त्यांच्या कलाकृतींवर जपानी पारंपरिकतेची शैलीव तंत्रांची सौंदर्यमूल्ये ही माजगावकरांच्या शैलीने भारलेली दिसतात. माजगावकरांच्या शैलीतील, पारंपरिकता जरी दिसत असली आणि वास्तवातील चित्रविषयांचा जरी त्यांना स्पर्श होत असला, तरी त्यांच्या शैलीतील आधुनिकता म्हणजे जुन्या खानदानी स्त्रीने आधुनिक अलंकार धारण करुन त्या अलंकारांनाच सुंदरता बहाल करुन दिलेली असते.



सुमारे चाळीसहून अधिक काळ कलाक्षेत्रात नानाविध प्रयोग, काळानुरूप आणि कलानुरूप प्रयोग करत, नवनवीन चित्रशैली-चित्र प्रयोग त्यांचे सुरुच असल्यामुळे आजच्या बर्‍याच प्रस्थापित कलाकारांप्रमाणे ते एकाच शैलीतंत्रात अडकून पडले नाहीत. उलट विविध शैली व तंत्रांनाच माजगावकरांच्या कलाप्रतिभेचे संस्कार होऊन एकप्रकारे कोंदण मिळत गेले, असे म्हणता येईल. इतका प्रगल्भ, अफाट कलाभान, अदम्य कला प्रतिभा असणारा हा कलातपस्वी पुरुष सांगली-कोल्हापूरच्या पुढे तुलनेने अज्ञात का राहिला असावा? कलाजगताहूनही बाह्यजगताशीही अशा प्रामाणिक कलासाधकाचा परिचय व्हायलाच हवा, असं मला वाटतं. मी २००७साली राज्य कला प्रदर्शन अधिकारी असताना प्रा. माजगावकर सरांना कलाकृतींच्या परीक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांच्या सहवासाचा लाभ मिळाला होता. कलाकृती पाहताक्षणीच ती उत्स्फूर्त आहे की ‘अरेंज्ड’ आहे, हे त्यांनी फार अचूकतेने सांगितले होते. सेलिब्रेटी कलाकारांप्रमाणे त्यांना वागता येत नसले तरी त्यांची कलाकृती संग्रही असणं, हेच खरंतर जाणकार कलारसिकांसाठी ‘सेलिब्रेशन’च असतं. प्रा. माजगावकरांच्या कलासाधनेला सुदृढ दीर्घायुष्यासह सुयश चिंतण्यासाठीही भाग्यच हवं..!!


- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@