मुंबई : सध्या मुंबईमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. अशामध्ये अनेकवेळा प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि कोरोना रुग्णांबाबतची पालिकेची उदासिनता विरोधीपक्षाने समोर आणले आहे. अशीच एक घटना मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये घडली. श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलेकडे कोरोनाचा रिपोर्ट नसल्याने रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर उपचाराविना महिलेचा तडफडून मृत्यू झाला आहे. पालिकेच्या मुलुंड मिठागर कोविड सेंटर, सावरकर रुग्णालय, आंबेडकर रुग्णालयाने महिलेला उपचारासाठी नकार दिला होता.
संबधित महिलेला श्वसनासहीत सर्दी खोकला आणि कफचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर काही फरक न पडल्याने त्यांना घेऊन पतीने आसपासच्या रुग्णालयात भटकंती केली. मात्र कोरोना चाचणीचे रिपोर्ट त्यांच्याकडे नसल्याने, पालिकेच्या मुलुंड मिठागर कोविड सेंटर तसेच सावरकर रुग्णालय, आंबेडकर रुग्णालयाने या महिलेस दाखल करण्यास नकार दिला. तब्बल १२ तास भटकंती केल्यानंतर शेवटी सुषमा यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या धावपळीत त्यांची प्रकृती आणखीन खालवत होती. सायन रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करताच या महिलेचा मृत्यू झाला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई आयुक्त इकबालसिंग चहल यांना पत्र लिहून या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी भांडूप परिसरात रोष व्यक्त करण्यात येत असून या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला. वारंवार अशा घटना घडत असल्याने सामान्य जनतेचा पालिका प्रशासानावरून विश्वास उडाला असल्याचे चित्र दिसत आहे.