कोरोनापुढे मुंबई महानगरपालिका आयुक्त हतबल!

23 Jul 2020 19:53:39
iqbal singh chahal_1 


लस उपलब्ध होईपर्यंत कोरोना शून्यावर आणणे अशक्य असल्याची कबुली



मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न होत आहेत. त्याला यशही येत आहे. पण लस उपलब्ध होईपर्यंत कोरोनाबधितांची संख्या शून्यावर आणणे अशक्य आहे, अशी स्पष्ट कबुली महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी एक वृत्तवहिनीला मुलाखतीत दिली.


मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एक लाखांच्यावर गेला असला, तरी कोरोनावर मात करत घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही ७३ हजारांच्या घरात पोहोचली आहे.‌मुंबईत रोज हजारांच्या घरात रुग्ण आढळत असले तरी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १५० ते २०० च्या घरातच असते‌‌. परंतु कोरोनावर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोनाचा आकडा शून्यावर आणणे शक्य नाही, अशी माहिती चहल यांनी दिली.


कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच विविध योजना राबवण्यास सुरुवात केली. ‌कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोध घेतल्यावर भर देत एका रुग्णामागे २० जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवत आता ४८ हजार खाटा उपलब्ध आहेत. कोरोना काळजी केंद्रात ९५ हजार खाटा उपलब्ध केल्या आहेत. कोरोनाचा पाठलाग करत रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास रुग्णालयात पोहोचण्याची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात आली. रुग्णवाहिन्यांची संख्या ८० वरुन ६३६ वर नेण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या वॉर्डात फोन केल्यास त्वरित खाट उपलब्ध होत, रुग्णवाहिका मिळवण्याची अडचण दूर केल्याचे चहल यांनी सांगितले.


फिव्हर कॅम्प, घरोघरी जाऊन तपासणी, संशयीत रुग्णांना रुग्णालयात दाखल करत योग्य उपचार करणे, अॅटिजेनी टेस्ट करण्याची मोहीम राबवली जात असून लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासनाला यश येईल, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.


कोरोना नियंत्रणात आणणे हे मुंबई महापालिका प्रशासनाचे एकट्याचे काम नव्हते. कोरोना विरोधात प्रत्येक जण लढा देत असून टीम वर्कमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे ते म्हणाले. दरम्यान कंटेन्मेंट झोनची संख्याही कमी होत असल्याचा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.




Powered By Sangraha 9.0