मुंबईत पहिले सागरी जीव उपचार केंद्र तयार; २६ जुलै रोजी उद्धाटन

    दिनांक  22-Jul-2020 20:20:09   
|

mangrove cell turtle cent

 

वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडून निर्मिती 

 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबई आणि आसपासच्या किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत वाहून येणारी समुद्री कासवे आणि सागरी सस्तन प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ऐरोलीतील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'च्या आवारात उपचार केंद्र उभे राहिले आहे. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडून (मॅंग्रोव्ह सेल) या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येत्या २६ जुलै रोजी म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनी' या केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
 
 
 

mangrove cell turtle cent 
 
 
 
पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे अशक्त किंवा जखमी अवस्थेतील सागरी जीव किनाऱ्यांवर वाहून येतात. मुंबईच्या किनाऱ्यांवर दरवर्षी पावसाळ्यात जखमी समुद्री कासवे किंवा डाॅल्फिन, पाॅरपाॅईज सारखे सागरी सस्तन प्राणी वाहून आलेले आढळतात. यामध्ये सागरी कासवांची संख्या सर्वाधिक असते. अशा जखमी सागरी जीवांवर प्राणिप्रेमी संघटना वन विभागाच्या परवानगीने बऱ्याचदा खासगी पशुवैद्यकांकडून उपचार करुन घेतात. तसेच एखादे कासव गंभीर जखमी असल्यास त्यांना डहाणूतील समुद्री कासव सुश्रुषा केंद्रात पाठविण्यात येते. मात्र, आता मुंबईच्या किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत वाहून येणाऱ्या सागरी जीवांवर ऐरोलीत उपचार होणार आहेत. 'मॅंग्रोव्ह सेल'कडून ऐरोलीच्या 'किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा'च्या आवारात सागरी जीव उपचार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. वन विभागाकडून मुंबईत प्रथमच अशा प्रकारे सागरी जीवांच्या उपचाराकरिता केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
 
 

mangrove cell turtle cent 
 
 
 
गेल्या महिन्याभराच्या कालावधीत ऐरोली केंद्राच्या आवारात सागरी जीवांवर उपचार करण्यासाठी दोन कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दिली. यामधील एका कक्षात सागरी जीवांवर शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यासाठी वैद्यकीय साधन सामुग्री ठेवण्यात आली आहे. तर उपचारानंतर सागरी जीवांवर देखरेख ठेवून त्यासंबंधी व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ३४ X १७ फूट आकाराच्या दुसऱ्या कक्षांमध्ये उपचारानंतर सागरी जीवांना ठेवण्यासाठी ५०० लीटरच्या ५ टाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै रोजी म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनी' आम्ही या केंद्राचे उद्घाटन करणार असल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेन्द्र तिवारी यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. या केंद्राच्या निर्मितीसाठी साधारण नऊ ते दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपचार केंद्र बांधण्यासाठी लक्ष केंद्रीत करणार असून त्याठिकाणी जागेचा शोध घेण्यासाठी सुरुवात केल्यााचे त्यांनी सांगितले. या केंद्रामुळे मुंबईच्या किनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी सागरी जीवांवर उपचार करणे सोपे होणार आहे. शिवाय संशोधनाच्या अनुषंगाने देखील ऐरोलीच्या केंद्रात दाखल होणाऱ्या जखमी कासवांवर अभ्यास करुन भविष्यात त्यांच्यासाठी आखण्यात येणाऱ्या संवर्धनात्मक उपाययोजना तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचे मत 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशनचे' सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी व्यक्त केले. 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.