इकडे आड तिकडे विहीर

22 Jul 2020 21:52:59

uddhav thackeray_1 &


माजिद मेमनसारखी व्यक्तीही बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला श्रीराममंदिराच्या पायाभरणी सोहळ्याला जाऊ नका, धर्मनिरपेक्षतेची शपथ आहे तुम्हाला, अशी धमकी देऊ लागली. तसे नसते आणि शिवसेनेने आपला करारी बाणा सोडला नसता तर मेमन यांची ही हिंमतच झाली नसती. कोणीही यावे नि टपली मारुन जावे, असा हा प्रकार असून यातून शिवसेनेची आजची दयनीय अवस्थाच दिसून येते.



रविवारी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराममंदिर निर्मितीसाठी पायाभरणी सोहळ्याची तारीख निश्चित झाली आणि इकडे महाराष्ट्रातील तिघाडी सरकारची खाट कुरकुरायला लागली. कारण, श्रीराममंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच अडचणीत आणले. विद्यमान राज्य सरकारचे मुख्य सूत्रधार शरद पवार बारामतीकरांनी ‘श्रीराममंदिर उभारणीमुळे कोरोना जाईल का,’ असे विचारत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना अयोध्येला न जाण्याचा इशारा दिला. पवारांनी दिलेला संदेश विरत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी सरकारच्या धर्मनिरपेक्षतेची आठवण करुन दिली. “उद्धव ठाकरे हे राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातील निमंत्रित पाहुण्यांपैकी एक आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. मात्र, धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखाने असे धार्मिक सोहळे टाळायला हवे,” असे ट्विट मेमन यांनी केले. तथापि, राजकीय नेत्यांनी इफ्तार पार्टीत भाग घेणे, जाळीदार गोल टोपी घालणे, दर्ग्यावर चादर चढवणे, हज हाऊस बांधणे आदी उद्योगांवेळी मेमनसारख्यांची धर्मनिरपेक्षता शिरखुर्म्यात गटांगळ्या खात असते, हेही लक्षात घेण्यासारखे!


दरम्यान, शरद पवार आणि माजिद मेमन यांच्या विधानांनंतर काँग्रेसनेदेखील मुख्यमंत्री किंवा शिवसेनेबरोबर राहण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचीच साथ दिली नि उद्धव ठाकरेंची गोची झाली. कारण, मेमन यांच्या ट्विटआधी शिवसेना खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे म्हटले होते. मात्र, माजिद मेमन यांनी ट्विटच्या माध्यमातून “ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसची परवानगी घ्यावीच लागेल आणि आम्ही ती दिली तरच अयोध्येला जाता येईल,” हे सूचित केले, तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र पराक्रम करत थेट श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त व्यवस्थेकडे उद्धव ठाकरेंना मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी पत्रच पाठवले. अर्थात सरकारमध्ये सहभागी झालेल्या तीन पक्षांतील दोन पक्ष मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या पायाभरणीला जाऊ नये, असे म्हणत आहेत, तर स्वपक्षीय मात्र उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाण्याची आशा बाळगून आहेत. इथेच ठाकरेंपुढे पेच उभा ठाकल्याचे नि सत्तेचा आड सांभाळू की कार्यकर्त्यांची विहीर, अशी द्विधावस्था निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.




वस्तुतः दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडताना सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडाच हिंदू, हिंदुत्वाचा विरोध-द्वेष करणे हा होता. पण, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन वाटचाल करण्यापेक्षा त्यांनी हयातभर ज्यांना विरोध केला, त्यांच्याच दावणीला स्वतःला बांधून घेण्याचा उपद्व्याप उद्धव ठाकरे यांनी केला. तो अर्थातच भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायचे, या एकमेव उद्देशाने, त्यात विचार, भूमिका वगैरेंना कसलेही स्थान नव्हते. इथेच हिंदुत्वाचे कैवारी आपणच, अशा घोषणा देणार्‍या शिवसेनेच्या वाघाची मांजर होऊन ती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी लाचार झाली. परिणामी, आता माजिद मेमनसारखी व्यक्तीही बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ‘श्रीराममंदिराच्या पायाभरणी सोहळ्याला जाऊ नका, धर्मनिरपेक्षतेची शपथ आहे तुम्हाला,’ अशी धमकी देऊ लागली. तसे नसते आणि शिवसेनेने आपला करारी बाणा सोडला नसता तर मेमन यांची ही हिंमतच झाली नसती. कोणीही यावे नि टपली मारुन जावे, असा हा प्रकार असून यातून शिवसेनेची आजची दयनीय अवस्थाच दिसून येते.



दुसर्‍या बाजूला शिवसेना सत्तेत बसल्यानंतर सातत्याने ‘आम्ही हिंदुत्व सोडले नाही,’ असे म्हणत आली. खरे म्हणजे शिवसेनेवर घसा ताणत हे सांगण्याची वेळ आली, यातच त्या पक्षाने काय सोडले आणि काय धरले, हे समजते. तथापि, आता उद्धव ठाकरे ज्या कशाला हिंदुत्व मानतात, ते सिद्ध करण्यासाठी जरी त्यांना अयोध्येला जायचे असले तरी शरद पवार आणि सोनिया गांधींसमोर नाक घासावेच लागणार. कारण, शरद पवार किंवा सोनिया गांधी हे दोघेही नेते प्रथमपासूनच श्रीराममंदिराचा विरोध करत आले. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचीही त्यांनी कधी फिकीर केली नाही. अशा मंडळींशी सख्य केल्याने उद्धव ठाकरेंनाही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकावे लागेल. ही तीन दगडांवर पाय ठेवायची भारीच कसरत असून एका जरी दगडावरुन पाय घसरला तरी कपाळमोक्ष होण्याचा धोका आहे. त्यातही एवढे सगळे करुन परवानगी मिळालीच तर शिवसैनिकांत चुकीचाच संदेश जाणार. कारण, शिवसैनिकांनी आतापर्यंत आदेश देणारा पक्षप्रमुख पाहिला, पण इथे तर ‘जी हुजूर’ करणारा पक्षप्रमुख त्यांच्या वाट्याला आल्याचे त्यांना पाहावे लागेल. अशावेळी, ‘काका, मॅडम मला अयोध्येला जाऊ द्या ना वं,’ असे म्हणणारा पक्षप्रमुख आपल्या नशिबी आल्याची सल सच्चा शिवसैनिकाच्या मनात कायमची राहणार नि त्याला जबाबदार उद्धव ठाकरे व त्यांचे मुलाखतकार प्रवक्तेच असतील.


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एनओसी’चा मुद्दा त्यांच्या पक्षाच्या मतदारांशी निगडित आहे, तर शिवसेनेचा अयोध्येला जाण्याचा मुद्दा आपल्या कार्यकर्त्यांनी नाराज न होण्याशी संबंधित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना परवानगी दिली, तर त्यांची मुस्लीम मतपेटी दुरावण्याची भीती आणि परवानगी न दिली तर शिवसेनेला आपली मतपेटी दुरावण्याची धास्ती. विधानसभेतील विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस अंतर्विरोधाचा आणि सरकार आपल्याच बोजाने पडण्याचा जो दावा करतात, तो इथे बरोबर लागू होतो. हे सरकार कोलमडावे, कोसळावे म्हणून विरोधकांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण, त्यांचा जो काही विचारगोंधळ सुरु आहे, त्याच्याच ओझ्याखाली ते दबले जाणार आहे. अयोध्येतील श्रीराममंदिराचा पायाभरणी सोहळा आणि त्याला उद्धव ठाकरेंना जाऊ द्यायचे की नाही, यातून हा भार वाढता वाढता आणखी वाढणार आहे. कोरोना रुग्ण व बळींची सातत्याने वाढणारी संख्या, ‘लॉकडाऊन’ की ‘अनलॉक’, अधिकार्‍यांच्या बदल्या, गणेशोत्सव व बकरी ईदसंदर्भातील आदेश आणि सूचना आदी प्रकारांमुळे विद्यमान सरकार आधीच कमालीचे वाकलेले आहे. आता फक्त अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पायाभरणीचा सोहळा आणि त्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती-अनुपस्थिती ही या सत्ताधारी उंटाच्या पाठीवरील अखेरची काडी ठरते की काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Powered By Sangraha 9.0