चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा ; अमेरिकेचा आदेश

22 Jul 2020 19:00:14

USA China_1  H



ह्युस्टन :
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास ७२ तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या या आदेशानंतर दूतावासाच्या आतून धूर दिसून येत असून अशी माहिती येत आहे की, चिनी कर्मचारी गोपनीय कागदपत्रे दूतावासात जाळत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीनने अमेरिकेला दिली आहे.





अधिकारी कागदपत्रे जाळण्याच्या प्रयत्नात

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्युस्टन पोलिस विभाग आणि अग्निशमन अधिकारी आवारात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. केपीआरसी २ ह्यूस्टनने शेअर केलेल्या तपशीलांनुसार पोलिसांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ३४१७ माँट्रिओ बुलेव्हार्ड, चिनी वाणिज्य दूतावास जेथे आहे त्याभागात आग लागल्याची माहिती मिळाली. इतक्या अल्पावधीत वाणिज्य दूतावास रिकामे करण्याच्या आदेशाने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला धक्का बसला आहे.


अमेरिकेच्या आदेशानंतर चिनी दूतावासात गोंधळाचे वातावरण होते. एवढेच नव्हे, तर चिनी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गोपनीय कागदपत्रे जाळताना दिसत आहेत. कर्मचार्‍यांची कागदपत्रे जाळण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाने चीनशी असलेले त्याचे संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे.


टाइम्सच्या नाऊच्या वृत्तानुसार, ह्युस्टन पोलीसदेखील वकिलातीबाहेर जातात, पण मुत्सद्दी हक्कांमुळे ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. पोलिसांनी सांगितले की, दूतावासातून धूर निघत असल्याचे पाहून स्थानिक लोकांनी त्यांना माहिती दिली, त्यानंतर ते तेथे आले, पण चिनी अधिका-यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. शीतयुद्धानंतर अमेरिकेने प्रथमच कोणत्या तरी देशाला दूतावास बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ह्युस्टनचे वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0