'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं शरद पवारांना पाठवणार

22 Jul 2020 18:19:29

vikrant patil _2 &nb



मुंबई :
अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणचां शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे वादग्रस्त विधान देशातील जाणत्या नेत्याने करणे खेदजनक असून भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे.


राममंदिर भूमिपूजन सोहळ्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण असताना शरद पवार यांच्या विधानामुळे त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, 'जय श्रीराम' लिहिलेली पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' येथे पाठवावीत . याला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून १० लाख पत्र शरद पवार यांच्या मुंबई स्थित निवासस्थानी पाठविण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले आहे.




vikrant patil _1 &nb

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असंख्य कार्यकर्ते तथा नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मोठ्या संख्येने पत्र जमा करीत आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांच्याकडे जमा झालेली पत्रे पनवेल येथे पोस्ट ऑफिसमध्ये जमा केली आहेत. याविषयी माहिती देताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, 'शरद पवार हे जाणते आणि सन्माननीय नेते आहेत परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कोणी बोलणार असेल तर प्रभु रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, कोरोनाच्या विषयांमध्ये केंद्रातील सरकार उचित कार्यवाही करत असून संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे. इतर सर्व राज्यही चांगले काम करीत आहेत.परंतु,या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कोठेही सुसूत्रता दिसत नाही. महाराष्ट्र आज देशात कोरोना आकडेवारीत नंबर वन झालेला आहे. आघाडी सरकारमधील तीनही पक्षात बिलकुल समन्वय दिसत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे, त्यामुळे राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही, तर मग ज्यामुळे करोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारची शिकवणी घेऊन त्यांना शिकवाव्यात म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवार व महाविकासआघाडी सरकारला लगावला. आज आणि उद्या महाराष्ट्रभरात भाजयुमोचे अनेक कार्यकर्ते तथा असंख्य नागरिक ठिकाणी 'जय श्रीराम' लिहिलेली पत्र शरद पवार यांना पाठवणार असून निषेध व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 
Powered By Sangraha 9.0