कष्टाचा प्रवास संपवणारी आंचल गंगवाल

21 Jul 2020 20:33:44

Gangwal_1  H x





‘चहावाल्याची मुलगी’ ते महिला ‘फायटर पायलट’ असा यशस्वी प्रवास करणार्‍या मध्य प्रदेशमधील 24 वर्षीय आंचल गंगवाल हिच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



एकविसाव्या शतकात स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रांत अग्रेसर असून ती पुरुषांच्या तुलनेत अजिबात मागे राहिलेली नाही. क्रीडा, संशोधन, वैद्यकक्षेत्र, अंतराळ अशा सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. अगदी रणांगणातही तिने आपले धैर्य, शौर्य सिद्ध केले. भारतीय सैन्यदलात पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियांनीही मोलाची कामगिरी बजावली असून ‘शौर्य पुरस्कारां’वर आपले नाव कोरण्यात यश मिळवले आहे. अगदी लढाऊ विमानांमध्ये उड्डाण भरण्याची जबाबदारीही स्त्रिया सहजपणे आपल्या खांद्यावर घेत असल्याचे सध्याच्या काळात पाहायला मिळते. 


म्हणूनच आजघडीला स्त्रिया या पुरुषांशी बरोबरी नाही, तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच स्त्रियांचे कौतुक करावे तेवढे कमीच, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी विविध स्त्रियांनी आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला असून अपार कष्टांच्या जोरावरच स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले आहे. मातृत्वाचे प्रेमळ वात्सल्य ते दुर्गेसारखा अवतार धारण करण्याची क्षमता राखणार्‍या स्त्रियांच्या कर्तृत्वाला म्हणूनच सलाम केला जातो. असेच सलाम करण्यासारखे कर्तृत्व करत मैदान गाजवले आहे ते मध्य प्रदेशमधील आंचल गंगवाल या तरुणीने. या २४ वर्षीय तरुणीने लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवत महिलांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.


एका गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या तरुणीने अपार कष्टाच्या जोरावर महिला लढाऊ वैमानिक म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी आंचलचे याबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. आजघडीला एक यशस्वी लढाऊ वैमानिक म्हणून आंचल गंगवाल सर्वत्र प्रसिद्ध असली तरी इथवर पोहोचण्यास तिने आपल्या जीवनात मोठा संघर्ष केला आहे.


आंचल गंगवाल हिचा जन्म 24 जानेवारी 1996 रोजी मध्य प्रदेशमधील निमच या गावी झाला. निमच हे गाव राजधानी भोपाळपासून 400 किमीच्या अंतरावर आहे. या गावात पायाभूत सुविधांची आधीच वानवा. शहरातील नागरिकांना अगदी सहजरित्या उपलब्ध होणार्‍या सुविधांसाठीही येथे संघर्ष करावा लागतो. मात्र, या संघर्षातून खचून न जाता त्यावर मात करत आंचलने ‘फायटर पायलट’ होण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वबळावर पूर्णही केले. आंचल हिचे वडील सुरेश गंगवाल यांची एक छोटेखानी चहाची टपरी आहे. तालुका कार्यालयाबाहेर असणार्‍या या छोटेखानी चहाच्या टपरीवरच गंगवाल कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. चहाच्या टपरीतून मिळणार्‍या पैशांतून घर चालविताना गंगवाल कुटुंबीयांची आर्थिक ओढाताणही व्हायची.


मात्र, अशा कठीण परिस्थितीतही खचून न जाता गंगवाल यांनी आंचलला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय आपल्या उराशी बाळगले आणि अपार कष्ट व आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्णही केले. आंचल ही लहानपणापासूनच शिक्षणात हुशार होती. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला उच्चशिक्षित होण्याखेरीज पर्याय नसल्याची जाण ठेवत तिने आधीपासूनच शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले. माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत तिने आपले नाव कमावले. त्यानंतर महाविद्यालयीन परीक्षांमध्येही उत्तम कामगिरी करत तिने आपली यशस्वी वाटचाल सुरुच ठेवली. वर्ष 2013 मध्ये उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आलेल्या भीषण वादळानंतर वायुसेनेचे कर्मचारी मोठ्या शौर्याने तेथील नागरिकांची मदत करत होते. ते आंचलने पाहिले आणि त्यातून प्रेरणा घेत, तिने ‘फायटर पायलट’ बनण्याचे ध्येय निश्चित केले.


‘फायटर पायलट’साठीचे शिक्षण हे गंगवाल यांच्या आर्थिक परिस्थितीला परवडणारे नव्हते. या क्षेत्रात उतरण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारे शुल्क भरण्यासाठीही गंगवाल कुटुंबीयांना एकेकाळी इतरांकडे हात पसरावे लागले होते. मात्र, आंचल ही कष्टकरी असून ती नक्कीच याचे चीज करेल, असा विश्वास गंगवाल कुटुंबीयांना होता. या विश्वासातूनच गंगवाल कुटुंबीयांनी आंचलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबीयांच्या या मेहनतीचे चीज करण्याचे आंचल यांनी ठरवले. त्यांनी पूर्ण मेहनतीने ही परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवले. आंचल लवकरच हैद्राबाद येथील वायुसेनेच्या केंद्रात ‘फायटर पायलट’चे प्रशिक्षण घेणार आहेत. लवकरच महिला लढाऊ वैमानिक म्हणून त्या गगनभरारी घेणार आहेत.


गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशाच्या वाट्याला लढाऊ महिला वैमानिक होण्याचा योग आला नव्हता. मात्र, आंचल हिच्या रुपाने मध्य प्रदेशला महिला लढाऊ वैज्ञानिक मिळाली असून याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच. पुढील प्रवासासाठी आंचलला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक
Powered By Sangraha 9.0