तीन घटना, एक निष्कर्ष

21 Jul 2020 20:37:21

Imran Khan _1  



पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्थेपासून ते अगदी सामाजिक व्यवस्थेपर्यंत काहीच समाधानकारक नाही. पडद्यामागून सैन्य चालवत असलेला हा देश भविष्यातही सुधारेल, ही आशाही मूर्खपणाची ठरावी. पाकिस्तानच्या पापाचा खडा भरला आहे. फक्त वाट बघायची ती तो कधी फुटेल याची! 



कोरोनामुळे जगाच्या पाठीवर हाहाकार उडालेला असताना, शेजारी पाकिस्तानात मात्र सुरुवातीपासूनच या महामारीला इमरान सरकारने फारसे गांभीर्याने घेतले नाही. ‘लॉकडाऊन’ न करण्याचा निर्णय घेतलेल्यांपैकी पाकिस्तान हा एक देश. परिणामी, पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांनी आता अडीच लाखांचा टप्पाही ओलांडला. पण, एकीकडे हे महामारीचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या तीन विविध घटनांचा निष्कर्ष मात्र या देशाच्या अंताकडेच खुणावताना दिसतो. तेव्हा, कोरोनाव्यतिरिक्त नेमक्या कोणत्या आहेत या तीन घटना, ज्यामुळे पाकिस्तान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे, ते पाहूया.

पाकिस्तानमधील कट्टर धर्मांधळेपणा हीदेखील पाकची एक नापाक ओळख. काही दिवसांपूर्वी राजधानी इस्लामाबादेत कृष्णाचे मंदिर उभारणीला विरोध करुन तिथे नासधूस केल्यानंतर आता खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुद्धप्रतिमेची तोडफोड करण्यात आली. विशेष म्हणजे, हा प्रांत म्हणजे ऐतिहासिक परंपरा लाभलेला गांधार प्रांत. श्रीलंका, कोरिया, जपानमधून आजही बुद्ध धर्माचे अनुयायी पर्यटनासाठी देखील या भागात भक्तिभावाने हजेरी लावतात. पण, याची पूर्ण कल्पना असूनही या महत्त्वाच्या ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना कोणतीही सुरक्षा प्रदान करण्यात आली नव्हती. गिल्गिट-बाल्टिस्तानमध्येही काही महिन्यांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारानंतरही पाकिस्तानला भारतानेही खडे बोल सुनावले होते व या प्राचीन अवशेषांचे जतन, संवर्धन करण्याचा सल्ला दिला होता.


परंतु, पाकिस्तान सरकारने त्याकडे सपशेल कानाडोळा केला आणि यापुढेही अशीच धार्मिक आक्रमणे होत राहिली, तर हडप्पा-मोहेंजेदडो हे सिंधू संस्कृतीचे प्राचीन ऐतिहासिक वारसास्थळही या कट्टरवाद्यांच्या भक्ष्यस्थानी सापडेल. त्यामुळे पाकिस्तानात मुस्लीम धर्मियांव्यतिरिक्त इतर धर्मियांना ना कुठली किंमत, ना त्यांच्या आस्थांचे मूल्य. बिगरमुस्लीम पाकिस्तानी कागदोपत्री या देशाचे नागरिक असले, तरी त्यांचा दर्जा हा कायमच दुय्यम राहिला आणि यापुढेही तो असाच राहील, यात तीळमात्र शंका नाही. घडल्या प्रकारानंतर जगभरातून पाकिस्तान टीकेचा धनी झाला असला तरी यातून हा देश आणि तेथील कट्टरपंथींच्या डोक्यात प्रकाश पडणारा नाहीच.

आता वळूया दुसर्‍या घटनेकडे. ‘युएस पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो’च्या एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अफगाणिस्ताननंतर आशिया खंडात सर्वाधिक लोकसंख्यावाढीचा दर असलेला दुसरा देश आहे पाकिस्तान. अफगाणिस्तानात जन्मदर हा ४.४ टक्के असून त्याखालोखाल पाकिस्तानात तो ३.६ टक्के आणि भारतात हाच दर २.२ टक्के आहे. परंतु, अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानसाठी हा अधिक चिंतेचा विषय आहे. कारण, अफगाणिस्तानात जन्मदर अधिक असला तरी त्यांची लोकसंख्या ही अद्याप ३.८९ कोटी आहे.


पण, अपुर्‍या वैद्यकीय सोयीसुविधांअभावी मृत्यू दर जास्त असल्यामुळे आणि जीवनमान कमी असल्याने अफगाणिस्तानसाठी लोकसंख्यावाढ हा कळीचा मुद्दा नाही. पण, सुमारे २२ कोटींच्या पाकिस्तानात उपासमार, बेरोजगारी, महागाईने संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे, तिथे लोकसंख्येचा विस्फोट हा चिंताजनक विषय आहे. त्यातच प्रजनन नियंत्रणाबाबतीत धार्मिक गैरसमजुती आणि धारणा यामध्ये बदल पाकिस्तानात होईल, याची सुतराम शक्यताही नाही. त्यामुळे आगामी काळात हीच वाढती लोकसंख्या या देशाचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही.


तिसरी घटना आहे, चिनी व्हिडिओ अ‍ॅप ‘बिगो’ आणि ‘पब्जी’वरील पाकिस्तामधील तात्पुरती बंदी. त्यातून ‘टिकटॉक’लाही पाकने इशारा दिला आहे की, अश्लीलता आणि तरुणांच्या वेळेशी, पैशाशी खेळणे थांबवा, अन्यथा चालते व्हा! आता सांस्कृतिकदृष्ट्या मौलवींच्या दबावाखाली पाकिस्तानने उचललेले हे पाऊल योग्य वाटत असले, तरी घनिष्ठ मित्र चीनशी असे पंगे घेणे पाकिस्तानला वारंवार परवडणारे नक्कीच नाही. तेव्हा, वरील तिन्ही घटना लक्षात घेता, एकच निष्कर्ष पुनश्च अधोरेखित होतो की, पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्थेपासून ते अगदी सामाजिक व्यवस्थेपर्यंत काहीच समाधानकारक नाही. पडद्यामागून सैन्य चालवत असलेला हा देश भविष्यातही सुधारेल, ही आशाही मूर्खपणाची ठरावी. पाकिस्तानच्या पापाचा खडा भरला आहे. फक्त वाट बघायची ती तो कधी फुटेल याची!








Powered By Sangraha 9.0