रक्त चाचणीतून समजणार कोरोना अहवाल

20 Jul 2020 14:38:36

covid test sample _1 




मेलबर्न :  कोरोना चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक वृत्त हाती आले आहे. कोरोना रुग्णांच्या चाचणीचा अहवाल आता केवळ 20 मिनिटांत दिला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी कोरोना टेस्टींगची नवी पद्धत अंमलात आणली आहे. रक्ताचे नमुने तपासून कोरोना झाला आहे की नाही याबद्दल अहवाल दिला जाऊ शकतो, असा दावा मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठाने केला आहे. यामुळे कोरोना चाचणी घेणाऱ्यालाही संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीही या तंत्राची मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कशी होणार चाचणी ? 

संशोधकांच्या मते, कोरोनाची चाचणी करण्यासाठी संशयित रुग्णाच्या शरीरातून 25 माइक्रोलीटर प्लाझ्मा घेतला जाईल. रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सॅम्पलमध्ये लाल रंगाच्या कोशिकांचा गुच्छ दिसू लागतो. हा फरक साध्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकतो, संशोधकांचा दावा आहे की, कोरोनाचा अहवाल यामुळे अवघ्या २० मिनिटांत समजू शकणार आहे.


एका तासात होणार दोनशे चाचण्या

संशोधकांच्या मते, कोरोनाच्या चाचण्या सध्या स्वॅब टेस्टींग किंवा पीसीआर टेस्टद्वारे केल्या जात आहेत. मात्र, नव्या चाचणीनुसार एका तासांत दोनशे रक्ताचे नमुने तपासले जाऊ शकतात. काही रुग्णालये किंवा प्रयोगशाळांमध्ये उच्च तंत्र निदान असणारी यंत्रणा (डायग्नोस्टिक मशीन) उपलब्ध आहे. त्याद्वारे एकूण सातशे रक्त नमुने तपासले जाऊ शकता. म्हणजेच एका प्रयोगशाळेत दिवसाला अंदाजे १६ हजार८०० इतक्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.


जास्त जोखीम असणाऱ्या देशांमध्ये फायदेशीर

संशोधकांच्या मते भारतासारख्या देशांमध्ये जिथे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे, तिथे हे तंत्र उपयोगी ठरणार आहे. जास्तीत जास्त रुग्ण कमी वेळात शोधता येतील. या नव्या चाचणी तंत्रासाठी पेटंट दाखल करण्यात आले आहे. लवकरच व्यावसायिक स्वरुपात याचा उपयोग सुरू केला जाणार आहे.



Powered By Sangraha 9.0