विस्तारवादी चीनला 'राफेल' रोखणार !

    दिनांक  20-Jul-2020 19:29:43
|
Rafael flight_1 &nbs
नवी दिल्ली : चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हवाई दलाची पुढच्या आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार असून बैठकीत हवाई दलातील प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच या महिन्याच्या अखेरीस दाखल होणाऱ्या राफेल या अत्याधुनिक लढाई विमानांच्या तैनातीबाबत चर्चा करण्यात येईल. हवाई दलातील टॉप कमांडर पुढच्या आठवड्यात होणार्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


२२ जुलैपासून हवाई दलाची दोन दिवसांची परिषद होणार आहे. यात सुरक्षेच्या मुद्यावर हवाई दलाकडून सखोर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. चीन सीमेवरील तणावाच्या स्थिती आणि सैन्याच्या आघाडीच्या ठिकाणांवर हवाई दलाने पूर्व लडाख आणि उत्तर सीमेवर विमानांची तैनाती केली आहे. या दोन मुद्द्यांवर हवाई दलाचे प्रमुख एअरची मार्शल आरकेएस भदुरिया आणि हवाई दलाच्या सात प्रमुख कमांडर्सचीही बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


हवाई दलाने आपल्या सर्व अत्याधुनिक लढाऊ विमानांचे ताफे तैनात केले आहे. यात मिराज २000, सुखोई-३0 आणि मिग-२९ या विमानांचा समावेश आहे. ही विमाने सीमेला लागून असलेल्या आघाडीच्या तळांवर तैनात केली आहे. दिवस किंवा रात्र अशा कुठल्याही कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. अत्याधुनिक असे अपाचे हेलिकॉप्टर्सही चीन सीमेला लागून असलेल्या तळांवर तैनात करण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टर्सद्वारे दिवस आणि रात्री सीमा भागात टेहळणी करण्यात येत आहे.


हवाई दलाच्या या उच्चस्तरीय बैठकीत भारतीय हवाई दलात समावेश होणाऱ्या राफेल या अत्याधुनिक विमानांवरही चर्चा केली जाणार आहे. ही विमाने या महिन्याच्या अखेरपर्यंत हवाई दलात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या विमानांची तैनाती आणि कारवाईसाठी त्यांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल, याच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. राफेल विमाने ही फ्रान्सकडून भारताला मिळणार आहेत. 


राफेल विमाने ही दक्षिण आशियात सर्वांत अत्याधुनिक विमाने आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाला मोठा आधार मिळणार आहे. कारण या विमानांमध्ये जगातील सर्वांत अत्याधुनिक अशी शस्त्रप्रणाली बसवण्यात आली आहे, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लेह, लडाख दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. सीमा सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात महत्वाच्या गोष्टी व बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राफेलबद्दलचाही निर्णय याच पार्श्वभूमीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.