‘बाबरमती’च्या पवारांचा जळफळाट

20 Jul 2020 23:29:13
sharad pawar_1  





पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिराची पायाभरणी करणार म्हणजे इतिहास रचला जाणार, मोदींचे नाव अमर होणार! परिणामी, ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कोणतेही ऐतिहासिक कार्य करु न शकलेल्या आणि सदैव भावी पंतप्रधान राहिलेल्या नेत्याचा जळफळाट होणारच. इतकेच नव्हे तर आगामी तीन ते साडेतीन वर्षांत मंदिर पूर्ण बांधून त्याचे उद्घाटनही मोदींच्याच हस्ते होईल आणि या वर्मी बसणार्‍या घावाने तर प्रचंड आशावादी असलेल्यांचा गळू ठसठसणारच!





“राम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येईल का?” असा सवाल ‘बारामती ते बाबरमती’ असा प्रवास केलेल्या शरद पवारांनी विचारला. शनिवारी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसंदर्भात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त व्यवस्थेची महत्त्वाची बैठक झाली. इथे श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दि. ३ व ५ ऑगस्ट अशा दोन तारखांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. रविवारी पंतप्रधान कार्यालयाने ५ ऑगस्ट ही तारीख श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी निश्चित केली आणि पवारांच्या पोटात गोळा आला.


प्रभू श्रीरामाचे नाव घेतल्याने सत्ययुगापासून कलियुगापर्यंत श्रीराम भक्तांच्या जीवनात वसंत फुलल्याचे आणि समाजकंटकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचे अनेक दाखले सापडतात. आताही श्रीराम मंदिर निर्मितीची तारीख जाहीर झाली आणि कोट्यवधी श्रीरामभक्तांचे शतकानुशतकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार हे स्पष्ट झाले. अयोध्याच नव्हे, तर देशासह जगभरात तसेच समाजमाध्यमांतही श्रीरामभक्तांनी अतीव आनंदाने श्रीराम मंदिराच्या पायाभरणी निश्चितीबद्दल भावना व्यक्त केल्या. त्याचे कारण गेल्या साडेपाचशे वर्षांपासून हिंदूंनी आपल्या आराध्यदैवतासाठी केलेल्या संघर्षात दडलेले आहे. अलीकडच्या काळात तर श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाने अवघा देश ढवळून निघाला. स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या श्रद्धास्थानांना, इतिहासपुरुषांना बाजूला सारुन मुगलांचे गोडवे गाणार्‍यांचे बुरखे फाटले, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदूंच्या खच्चीकरणाचे एक एक कारनामे उघड झाले आणि त्यातूनच देशातला हिंदू एकाचवेळी जागृत होऊ लागला. श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलनातूनच देशाच्या राजकीय अवकाशातही हिंदुत्वनिष्ठ आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी गटाची विभागणी झाली. पुढे अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर २०१४ साली भारताच्या याच स्वत्वजागरणातून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती देशाच्या सत्तास्थानी आल्या. २०१९ साली पुन्हा याच माध्यमातून हिंदूंच्या अस्मिता, प्रतीके आणि भावनांची काळजी करणार्‍या भाजपला सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळाली. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात श्रीरामजन्मभूमीमुक्ती व मंदिरनिर्मितीसाठी न्यायालयीन पातळीवर अतिवेगाने लढाई दिली गेली. परिणामी, राजकीय विजयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयातही हिंदू पक्षाचा विजय झाला आणि शेकडो वर्षांचा कलंक मिटला गेला.


तथापि, श्रीराम मंदिर उभारणीचे सर्व रस्ते मोकळे झाले, मात्र, या सगळ्या काळात ‘बाबरमती’च्या ‘जाणत्यां’नी सातत्याने बाबरी ढाँचाचीच कड घेतली. अगदी आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते आजही ते मंदिराची नव्हे, तर ढाँचाची तरफदारी करताना दिसतात. आता तर त्यांना, श्रीराम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का, हा प्रश्न सतावत आहे. मुळात श्रीराम मंदिर आणि कोरोना या दोन्ही निराळ्या गोष्टी आहेत. मंदिरनिर्मितीमुळे कोरोनाला आळा बसेल, असा दावाही कोणी केलेला नाही. हो, एक मात्र खरे की, लवासाधिपती व त्यांच्या सेक्युलर भाईबंदांची राजकीय दुकानदारी यामुळे नक्कीच उद्ध्वस्त होऊ शकते. कदाचित, यामुळेच स्वतःच्या आणि आपल्या भावी पिढीच्या भयाण चिंतेने ग्रासलेल्या शरद पवारांनी मंदिराला विरोध केलेला असावा.


पवारांना श्रीराम मंदिर उभारणी झोंबण्याचे आणखी एक कारण म्हणजे नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारी पायाभरणी! पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिराची पायाभरणी करणार म्हणजे इतिहास रचला जाणार, मोदींचे नाव अमर होणार! परिणामी, ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कोणतेही ऐतिहासिक कार्य करु न शकलेल्या आणि सदैव भावी पंतप्रधान राहिलेल्या नेत्याचा जळफळाट होणारच. इतकेच नव्हे तर आगामी तीन ते साडेतीन वर्षांत मंदिर पूर्ण बांधून त्याचे उद्घाटनही मोदींच्याच हस्ते होईल आणि या वर्मी बसणार्‍या घावाने तर प्रचंड आशावादी असलेल्यांचा गळू ठसठसणारच! ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे आणि इतरांची रेष लहान करण्याच्या नादात स्वतःची व स्वतःच्या राजकारणाची रेष मोठी करु न शकलेल्यांची चिडचिड, द्वेष, असुया अशा पद्धतीने बाहेर पडणारच. पण, आज श्रीराम मंदिराच्या निर्मितीने कोरोना जाणार का, असा प्रश्न विचारणार्‍यांनी कोरोनाकाळात दिलेल्या मुलाखतीने कोरोना गेला का? इतकेच नव्हे तर याआधी अनेकदा ‘बाबरमती’च्या करामती साहेबांनी जिथे-तिथे हज हाऊस बांधण्याची मागणी, घोषणा केलेली होती. अजूनही त्यांच्या मनात हज हाऊसची कल्पना आकार घेत असेल आणि प्रत्यक्षात तर देशात श्रीराम मंदिरनिर्मितीचा जल्लोष सुरु आहे. हे पाहून आपला सदासर्वकाळचा काड्या करण्याचा उद्योग करुन पाहुया, असा विचार त्यांनी केला आणि त्यातूनच श्रीराम मंदिरामुळे कोरोना जाईल का, असा प्रश्न विचारला.


अर्थात, या सगळ्याच्या मुळाशी इफ्तार पार्ट्या झोडणार्‍या शरद पवारांचा हिंदुद्वेष्टेपणाच आहे. कारण, काँग्रेसमध्ये असो वा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही पवारांनी एकगठ्ठा मतांसाठी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचे आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचेच काम केले. इस्लामी मतांसाठी तर तिहेरी तलाक हा कुराणाचा आदेश, ‘खिलाफत चळवळी’ची आवश्यकता आणि राज्यातील सत्ताबदलाचे श्रेय मुस्लिमांना अशी निरनिराळी विधाने त्यांनी केली. सोबतच कोरोना पसरवणार्‍या ‘तबलिगीं’ना का लक्ष्य करता, असा अगदी कळवळून प्रश्नही ‘बाबरमती’च्या साहेबांनी विचारला होता. तेव्हा त्यांना असे केल्याने कोरोना जाईल की आणखी पसरेल, हे समजत नव्हते का? आज तेच पवार राम मंदिराचा संबंध कोरोनाशी लावण्याचा घाणेरडा प्रकार करत आहेत.


विशेष म्हणजे, एकेकाळी ‘बाबरी ढाँचा आम्हीच पाडला,’ असे घसा ताणून सांगणारी शिवसेना आज शरद पवारांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तेत आहे. शिवसेना स्वतःला ‘ज्वलंत हिंदुत्ववादी’ वगैरे म्हणवून घेत असते आणि अयोध्येतील मंदिराचा प्रश्न आस्थेचा असल्याचेही सांगत असते. पण, आता सरकारच्या आधारवडानेच श्रीराम मंदिराला विरोध केला, तरीही शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवून दिलेले नाही. इथे एखादा सच्चा हिंदुत्वनिष्ठ असता तर श्रीराम मंदिरासाठी सत्तेला लाथ मारुन बाहेर पडला असता, पण केवळ बनवेगिरी करणार्‍या शिवसेनेत ती हिंमत कसली? उलट ती निर्लज्जपणे, श्रीरामाच्या अपमानालाही सन्मानच समजेल. अशा परिस्थितीत शरद पवारांनी केलेले विधान शिवसेनेला दिलेला इशाराही आहे. यदाकदाचित शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्या मनात श्रीराम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याला जाण्याची इच्छा असली तरी त्यांना माझी परवानगी घ्यावी लागेल, हे पवारांना यातून सांगायचे आहे. इतकेच नव्हे, तर माझी त्याला अनुमती नसेल, हा संदेशही त्यांनी उद्धव ठाकरेंना यातून दिलेला आहे. आता मुद्दा इतकाच की, मुख्यमंत्री शरद पवारांचे ऐकतात की उद्धव ठाकरे आपल्या पित्याच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनुसार मंदिराच्या पायाभरणीला जातात? तसेच ‘लॉकडाऊन’ काळात अपवाद वगळता घरात बसलेले ठाकरे कोरोनाला घाबरुन ‘मातोश्री’वरच थांबतात की कोरोनाच्या छाताडावर पाय देऊन अयोध्येला जातात, हा लाखमोलाचा प्रश्नही आहेच.




Powered By Sangraha 9.0