
बॉलीवूड घराणेशाही वादानंतर अभिनेता सैफ अली खानचा गौप्यस्फोट!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला. अशातच अभिनेता सैफ अली खानने मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो, असे वक्तव्य केले आहे.
कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही. करण जोहरबद्दल म्हणायचे झाल्यास, त्याने स्वत:ला इतके मोठे बनवले आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे, असे सैफने म्हटले आहे.
भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचे पाहून मला आनंद होतो, असे सैफने म्हटले आहे.
दरम्यान, सत्य हे नेहमी गुंतागुंतीचे असते. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. मला आशा आहे की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील, असेही सैफने म्हटले आहे.