पद्म पुरस्कार २०२१चे नामांकन १५सप्टेंबरपर्यंत खुली राहणार

02 Jul 2020 19:40:34

padma awardee_1 &nbs




नवी दिल्ली :
२०२१च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने/ शिफारशी दाखल करण्याची सुरुवात १ मे २०२०रोजी झाली होती. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२० आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने व शिफारशी पद्म पुरस्कारांच्या https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील. पद्म पुरस्कारांमध्ये मुख्यत्वे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. अतिशय उत्तम कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रे/ प्रकार यामध्ये उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. सार्वजनिक उपक्रमात डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांसह सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.




पद्म पुरस्कारांचे जनतेच्या पद्म पुरस्कारांमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच या पुरस्कारांसाठी आपल्या स्वतःच्या नामांकनासह नामांकने/ शिफारशी पाठवाव्यात अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. या नामांकनांमध्ये/ शिफारशींमध्ये वर उल्लेख केलेल्या पद्म पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात सर्व तपशील समाविष्ट असला पाहिजे. शिफारस केलेल्या व्यक्तीच्या संबंधित क्षेत्र/ प्रकारात उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीची माहिती या तपशीलामध्ये जास्तीत जास्त ८०० शब्दांमध्ये कथन केलेली असली पाहिजे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालये/ विभाग, राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांची सरकारे, भारत रत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, उच्च गुणवत्ता संस्था यांना अशी विनंती केली आहे की त्यांनी महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांमधून खऱ्या अर्थाने सर्वोत्तम आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या गुणवत्ताप्राप्त व्यक्तींची निवड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. या संदर्भात अधिक तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (www.mha.gov.in) या वेबसाईटवर ऍवॉर्ड्स अँड मेडल्स या विभागात उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित निकष आणि नियम वेबसाईटवर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहेत.


Powered By Sangraha 9.0