यापुढे महामार्ग प्रकल्पात चिनी कंपन्यांना परवानगी नाही : नितीन गडकरी

02 Jul 2020 09:50:12

nitin gadkari_1 &nbs



भारताकडून चीनला आणखी एक मोठा धक्का

दिल्ली : भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच परिपाक म्हणून भारताने ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. आता चिनी कंपन्या भारताच्या महामार्ग प्रकल्पात भाग घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय सरकारने घेतला आहे.



भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. जरी चीनच्या कंपन्यांनी भारतीय किंवा इतर कंपनीबरोबर जॉइंट व्हेंचर बनून बोली लावली तरी, त्यांना त्यामध्ये समाविष्ट केले जाणार नसल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


भारत-चीनसोबत सीमेवर तणाव वाढल्यानंतर भारताने चीनला आर्थिक स्तरावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर चिनी ५९ अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या निर्णयावर एक दिवस नाही होत तोच आता चिनी कंपन्यांना दुसरा धक्का दिला आहे.


नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे महामार्ग प्रकल्प घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखले जाणार आहे. केंद्र सरकार लवकरच चीनविरोधी पॉलिसी आणणार असून त्याद्वारे चिनी कंपन्यांची भारतीय प्रकल्पांमध्ये एन्ट्री बंद होईल. यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय कंपन्यांसाठी नियम सोपे केले जाणारा आहेत. कोणत्याही प्रकल्पात भारतीय कंपन्यांना अधिकाधिक संधी कशी मिळेल याचाही यामध्ये विचार केला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0