जीएसटी सुलभ करा ! अर्थमंत्र्यांचे निर्देश

    दिनांक  02-Jul-2020 15:56:16
|
Finance Ministers Nirmala

नवी दिल्ली : १ जुलै २०२० रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या देशभरातील सर्व कार्यालयांमध्ये तिसरा जीएसटी दिन साजरा करण्यात आला. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी जीएसटी अत्यंत उपयुक्त ठरले असून, ‘एक देश एक कर’ ही बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट यातून साध्य होत आहे. सध्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या दिवसानिमित्त, बहुतांश भागधारकांशी चर्चा आणि कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन घेण्यात आले.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन, जीएसटी दिनानिमित्तच्या संदेशात म्हणाल्या की, जीएसटी कर प्रशासन व्यवस्था अधिक सुलभ करण्याच्या बाबतीत आतापर्यंत बरेच मोठे काम करण्यात आले असून, हितसंबंधी गट आणि व्यक्तींच्या सूचना समजून घेत, त्यानुसार, अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, मात्र, देशात व्यवसायसुलभता निर्माण करण्यासठी कर रचना आणखी सोपी करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. 

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेवर भर देणे. जीएसटी करदात्यांसाठी, करप्रशासन व्यवस्था अधिक सुलभ करत देशात उद्योगसुलभ वातावरण निर्माण करण्यावर भर देणे. व्यापारी-उद्योजकांना भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा अंदाज बांधत, त्या सोडवण्यासाठी आधीच पावले उचलणे, आदी मुद्द्यांवर अर्थमंत्र्यांनी चर्चा केली. 

कोविड-19 च्या संकटकाळात सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांबाबत, अर्थमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. करदात्यांना मदत करण्यासाठी या काळात अधिकाऱ्यांनी अनेकदा चाकोरीबाहेर जाऊन पावले उचलली, असे त्या म्हणाल्या. तसेच, करदात्यांना रोखीची उपलब्धता व्हावी, यासाठी विक्रमी संख्येने करपरतावे दिल्याबद्दलही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले की, जीएसटी करविवरणपत्र भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जावी, तसेच इनपुट टॅक्स क्रेडीटला परवानगी देण्याची प्रक्रियाही जलद गतीने राबवायला हवी. टाळेबंदीदरम्यान, सीबीआयसी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांचे तसेच, माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा वापर करत, जीएसटी परताव्याची प्रक्रिया जलदगतीने राबवल्याचे ठाकूर यांनी कौतुक केले. त्याशिवाय, या काळात अडचणीत असलेल्या लोकांना मदत करत सामाजिक जबाबदारीने काम केल्याबद्दल देखील त्यांचे कौतुक करण्यात आले.

सीबीआयसीचे अध्यक्ष एम अजित कुमार, यांनी जीएसटी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना, करदात्यांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. अर्थमंत्र्यांच्या उद्योगपूरक वातावरणनिर्मितीच्या संदेशाच्या दिशेने काम केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.