सोन्याने पार केला ५० हजारांचा टप्पा!

02 Jul 2020 13:18:27

Gold Price_1  H


कोरोना काळात सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक!

मुंबई : लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल ५० हजार २८२ रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी जीएसटी जवळपास १५०० रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना १० ग्राम सोन्यासाठी जीएसटी पकडून ५१ हजार ७८२ रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसऱ्यापर्यंत ५५ ते ५६ हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येत आहे.


सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा १० ग्रामसाठी दर ४८ हजार ८८६ रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास १४०० रुपयांची वाढ होऊन तो ५० हजार २८२ रुपये इतका झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर आज सोन्याच्या दरात १० ग्रामसाठी १४०० रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांदी देखील ५० हजारांच्या पुढे गेली आहे. आणि आज दुसऱ्याच दिवशी सोने देखील ५० हजारांच्या पुढे गेले आहे.


कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या असुरक्षित वातावरणात ही सुरक्षित गुंतवणूक असल्याने लोकांचा सोन्याकडे कल दिसत आहे.




Powered By Sangraha 9.0